Coronavirus: कसं झालं 'कोरोना'चं बारसं?; काय आहे त्याचा अर्थ?... जाणून घ्या Interesting माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 06:29 PM2020-03-13T18:29:19+5:302020-03-13T18:30:13+5:30
Coronavirus गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले; त्यानंतर जगभरात कोरोनाचं थैमान
मुंबई: कोरोनानं सध्या अनेकांना धडकी भरली आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत ४ हजारहून अधिकांचा जीव घेतलाय. तर कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. भारतात आतापर्यंत ८१ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातले १७ जण महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सरकारपासून सर्वसामन्यांपर्यंत सगळेच जण चिंतेत आहेत.
गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत कोणालाही कोरोना शब्द फारसा कोणाला माहीत नव्हता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर चीनमध्ये कोरोनाचे शेकडो रुग्ण झपाट्यानं सापडू लागले. याची सुरुवात वुहानपासून झाली. सध्याच्या घडीला पाच खंडांमधल्या शंभरहून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना नावाची एक प्रसिद्ध बिअर आहे. मात्र या कोरोनाचा सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूशी कोणताही संबंध नाही.
कोरोनाचं नामकरण कसं झालं याची गोष्ट मोठी रंजक आहे. कोरोना शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. त्याचा शब्दश: अर्थ मुकूट असा होता. क्नीन्सलँड सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या विषाणूला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेनं पाहिल्यास त्याची रचना मुकूटासारखी दिसते. त्यामुळेच या विषाणूला कोरोना नाव देण्यात आलं.
कोरोनामुळे जगात महारोगराईची स्थिती निर्माण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ (COVID-19) असं नाव दिलं आहे. यातल्या CO चा अर्थ कोरोना, VI चा अर्थ व्हायरस आणि D चा अर्थ आजार असा होतो. तर १९ चा अर्थ २०१९ असा होतो. २०१९ मध्ये कोरोनाचा चीनमध्ये फैलाव झाला.