भारतीय उपखंड युरेशियात उच्चांकी वेगाने कसा घुसला?
By admin | Published: May 6, 2015 12:02 AM2015-05-06T00:02:10+5:302015-05-06T00:02:10+5:30
८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला.
हिमालय निर्मितीची चित्रकथा : संशोधनातून उकलले गुढ रहस्य; दोन प्रवाहांनी खेचले भारताला उत्तरेकडे
वॉशिंग्टन : ८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) जेव्हा युरेशियाच्या प्रतलात शिरले तेव्हा भारताने खंडीय वेगाचा उच्चांक गाठला. त्यावेळी दुहेरी प्रतल घर्षणामुळे ही घटना घडली असे अमेरिकेच्या एमआयटी (मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) संस्थेत करण्यात आलेल्या नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. खंड एकमेकाकडे सरकण्याच्या प्रक्रियेत भारताने हा गूढ उच्चांक गाठला आहे.
१४० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत हा सुपरखंडाचा एक भाग होता. गोंडवन या नावाने ओळखला जाणाऱ्या या प्रदेशाने संपूर्ण दक्षिण गोलार्ध व्यापला होता. १२० दशलक्ष वर्षांपूर्वी आता ज्याला आपण भारत म्हणतो तो भूभाग तुटला व उत्तरेकडे दरवर्षी ५ सें. मी. या गतीने सरकू लागला.
८० दशलक्ष वर्षांपूर्वी या सरकण्याचा वेग वाढला व दरवर्षी १५ सें.मी. गतीने हा भाग उत्तरेकडे सरकू लागला. हा वेग प्रतल सरकण्याचा अत्युच्च वेग मानला जातो. ५० दशलक्ष वर्षांपूर्वी भारत युरेशिया यांची टक्कर झाली व त्यातून हिमालयाचा जन्म झाला.
भारत युरेशियाकडे जलद गतीने कसा सरकला असेल याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न संशोधक करत होते. त्याचे उत्तर एमआयटी संस्थेतील भूगर्भतज्ज्ञांना मिळाले असून, त्यानुसार भारताला उत्तरेकडे खेचणारे दोन प्रवाह होते.
पृथ्वीवरील प्रतलापैकी एक प्रतल दुसऱ्या प्रतलात घुसतो हा त्यातील एक प्रवाह आहे. एक प्रतल आकुंचित झाल्यामुळे तो आजूबाजूचे सर्व वस्तुमान ओढून घेतो. त्यामुळे दोन प्रतल असे आकुंचित झाल्यास खेचले जाण्याचा वेग वाढतो. (वृत्तसंस्था)
लक्षावधी वर्षांपूर्वी घडलेल्या या नैसर्गिक उत्पाताची उकल नेपाळला बसलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानंतर झाली आहे. संशोधन करणाऱ्या एमआयटीच्या पथकाला हिमालयाच्या परिसरात अवश्ोष सापडले असून, ते या प्राचीन काळातील उत्पाताचे साक्षीदार असावेत असे मानले जात आहे.
नेपाळ भूकंपानंतर झाली उकल
या निष्कर्षाला आल्यानंतर शास्त्रज्ञांनी प्रतल खेचण्याच्या या संकल्पनेचे एक मॉडेल बनवले. त्यातील भारताच्या प्रतलाने उच्चांकी वेग कसा गाठला असेल याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानुसार ज्यावेळी ही खेचाखेच झाली त्यावेळी भारतीय प्रतलावर दोन घटकांचा दबाव होता.
आकुंचित होणाऱ्या दोन प्रतलांची रुंदी व त्यांच्यातील अंतर! हे दोन प्रतल कमी रुंद असून व एकमेकांपासून जास्त अंतरावर असतील, तर भारतीय प्रतल जास्त वेगाने खेचला गेला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.