इस्रायलने कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:22 AM2021-04-22T05:22:42+5:302021-04-22T05:23:58+5:30

सर्जनशील मानवी प्रज्ञेतून होणाऱ्या नवनिर्मितीचा मूर्त आविष्कार म्हणजे विविध प्रकारचे तंत्रज्ञान.  उपलब्ध माहितीनुसार, पहिली लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर येण्याचा भास होतानाच दुसऱ्या लाटेच्या उसळीनंतर, इस्रायलमधे तब्बल ३० ठिकाणी विविध प्रयोग सुरू झाले.

How did Israel gain control of the Corona? | इस्रायलने कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?

इस्रायलने कोरोनावर नियंत्रण कसे मिळवले?

googlenewsNext

गेल्या रविवारी इस्रायल नावाच्या छोट्याशा देशातून एक आशादायी बातमी जगासमोर आली. ही बातमी होती, कोरोनावरील नियंत्रणाची ! कोरोनापासून संपूर्ण मुक्तीच्या उंबरठ्यावर आज हा देश उभा  आहे. कोरोना विरोधातील लढ्यासाठी सरकारने निश्चित केलेली नियमावली, नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन आणि तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करत उपचाराची गती वाढविणे या त्रिसूत्रीमुळे आज या देशाला कोरोना नियंत्रणाचा उंबरठा गाठणे शक्य झाले आहे. महाकाय देशांच्या तुलनेत इस्रायलचे भौगोलिक क्षेत्र  किरकोळ असले तरी, कोरोना महामारीवरील नियंत्रणासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्या देशातील सरकारने संशोधकांना आवाहन करुन अत्यंत प्रभावी मार्ग शोधला. 


सर्जनशील मानवी प्रज्ञेतून होणाऱ्या नवनिर्मितीचा मूर्त आविष्कार म्हणजे विविध प्रकारचे तंत्रज्ञान.  उपलब्ध माहितीनुसार, पहिली लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर येण्याचा भास होतानाच दुसऱ्या लाटेच्या उसळीनंतर, इस्रायलमधे तब्बल ३० ठिकाणी विविध प्रयोग सुरू झाले. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा  वापर करुन कोविड रुग्णांना मदत, जीवनदान देण्याचे प्रयोग करण्यात आले. पहिला प्रयोग होता कोविडच्या चाचणीचा निकाल कमीत कमी वेळात मिळावा, यासाठीचा!  २४ तासांवरून निकालाची वेळ अवघ्या ५० मिनिटांवर आणण्यात तेथील संशोधकांना यश आले. त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार  शक्य झाले. कोविड रुग्णांना ॲपच्या सहाय्याने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. यामधे संगणकीकृत प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात होणारे विविध बदल मिनिटागणिक नोंदवले जात होते.


गृह विलगीकरणात असलेल्या लोकांना आवश्यक ती औषधे व ऑक्सिजन किंवा तत्सम गरजेच्या साधनांचा पुरवठा होत होता. या साऱ्या गरजा आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिपून, त्या गरजेशी जोडलेल्या यंत्रणेला याची माहिती मिळाली की संबंधित रुग्णाला तातडीने मदत मिळत असे.  सह-आजार असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांच्या शरीरात कोरोनाचा विषाणू कोणत्या अवयवावर किती घात करत आहे, याचे सातत्यपूर्ण मॉनिटरिंग करण्यात येत होते. या बदलांच्या अनुषंगाने त्या रुग्णांवर औषधोपचार तर होत होतेच, पण या बदलांच्या नोंदी देखील काटेकोरपणे ठेवल्या जात होत्या.  
या नोंदींमुळे विशिष्ट सह-आजारात तो विषाणू कोणत्या स्टेजला कसा प्रसार व घात करतो, याचे पॅटर्न डॉक्टरांच्या लक्षात आले आणि पुढील रुग्णांवर उपचार करताना त्याचा फायदा झाला. कोविड होऊन गेलेल्या नागरिकांना  प्लाझ्मा-दान करण्यासाठी आवाहन केले गेले. या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत, उपचार पद्धतीला हातभार लावला. 


छोट्या देशाची मोठी गोष्ट..
या अदृष्य विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. मित्र,आप्तेष्टांचे प्राण जात आहेत. ठोस औषध आजही नाही. लसीकरणाच्या माध्यमातून रोग-प्रतिकारकशक्ती विकसित करणे हाच तूर्तास एक सर्वमान्य उपाय दिसत आहे. इस्रायल या देशाचे आकारमान लहान आणि लोकसंख्याही कमी. त्यामुळे भारतासारख्या महाकाय देशाशी तुलना करणेही अशक्यच आहे. पण नियोजन, इच्छाशक्ती, अंमलबजावणी, सरकारी सूचनांचे नागरिकांकडून गांभीर्यपूर्वक पालन याचीच फलश्रुती आज तेथील नागरिक अनुभवत आहेत. छोट्या देशाची ही मोठी गोष्ट म्हणूनच लक्षणीय आहे !
छोट्या देशाची मोठी गोष्ट..
या अदृष्य विषाणूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. मित्र,आप्तेष्टांचे प्राण जात आहेत. ठोस औषध आजही नाही. लसीकरणाच्या माध्यमातून रोग-प्रतिकारकशक्ती विकसित करणे हाच तूर्तास एक सर्वमान्य उपाय दिसत आहे. इस्रायल या देशाचे आकारमान लहान आणि लोकसंख्याही कमी. त्यामुळे भारतासारख्या महाकाय देशाशी तुलना करणेही अशक्यच आहे. पण नियोजन, इच्छाशक्ती, अंमलबजावणी, सरकारी सूचनांचे नागरिकांकडून गांभीर्यपूर्वक पालन याचीच फलश्रुती आज तेथील नागरिक अनुभवत आहेत. छोट्या देशाची ही मोठी गोष्ट म्हणूनच लक्षणीय आहे !

रुग्णांचा आकडा लोकसंख्येच्या १० टक्क्यांच्या वर गेल्यानंतर, एका कंपनीने लोकांच्या आवाजाचे नमुने आणि त्याद्वारे शरीरात होणाऱ्या बदलानुसार कोविड होण्याची शक्यता, असे सॉफ्टवेअर विकसित केले. याचाही वापर लोकांना पूर्वसूचना मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला.  ज्यांचे औषधोपचारही संपुष्टात आले आहेत, अशा लोकांकडेही  सरकारने विशेष लक्ष ठेवले होते. त्यांच्या शरीरातील अवयवांवर कोरोनाने सोडलेल्या खुणा आणि त्यांचे पुढचे दिनमान, याच्याही नोंदी ठेवण्यात आल्या. शक्य तितकी सर्व माहिती संकलित करणे, त्याचे वर्गीकरण करून मग पृथःकरण करणे, यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत उपचार पद्धतीत बदल करणे, या समीकरणावर प्रामुख्याने संशोधकांनी भर दिला. या आणि अशा तब्बल ३० तंत्राविष्काराच्या माध्यमातून इस्रायलने संसर्ग साखळी रोखण्याचा प्रयत्न केला. आजवर जगात झालेल्या अनेक महत्वाच्या संशोधनात इस्रायली संशोधकांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे.  प्रतिकूल परिस्थितीचा अनुशेष या देशाने विचक्षण संशोधनात्मक बुद्धिमत्तेने भरून काढल्याचे अनेक उदाहरणातून दिसते.
उपचार पद्धतीत अत्याधुनिक, अमूलाग्र बदल करत लोकांना सुसज्ज उपचार देतानाच, दुसरीकडे कोरोनाची लसीकरण मोहीम देखील अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली. गर्दी होणार नाही अशा पद्धतीने सूक्ष्म व्यवस्थापन करून लसीकरण करण्यात आले. आजच्या घडीला अर्ध्या देशाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्वात वेगवान लसीकरण करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. 
-  कौस्तुभ कुर्लेकर

Web Title: How did Israel gain control of the Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.