अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ वैध आहे की नाही ते कसं ओळखावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:35 PM2021-03-06T16:35:27+5:302021-03-06T16:35:58+5:30
अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठात प्रवेश करताना त्याची वैधता जाणून घेणं गरजेचं आहे.
प्रश्न: अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ वैध आहे की नाही ते कसं कळू शकेल?
उत्तर: शाळेचा शोध घेताना अभ्यासक्रम आणि घोटाळे यांची माहिती घेणं गरजेचं आहे. अमेरिकेतल्या वैध शाळा आणि विद्यापीठांची माहिती तुम्ही विविध मार्गांनी मिळवू शकता. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पात्र असलेल्या शाळांची माहिती अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीकडे (https://studyinthestates.dhs.gov/school-search) उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची उच्च शिक्षण यंत्रणा समजून घेता यावी आणि त्यातून त्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठांची निवड करणं सोपं जावं यासाठी अमेरिकन सरकार एज्युकेशन यूएसएची (https://educationusa.state.gov/) सेवा मोफत देतं. यामध्ये अमेरिकेतील साडे चार हजारहून अधिक संस्थांची माहिती आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी मान्यताप्राप्त शाळा आणि विद्यापीठांना मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. ते अतिशय स्पष्टपणे त्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेचे निकष नमूद करतात. तुम्ही त्यात बसत नसल्यास प्रवेश मिळत नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इंग्रजी प्राविण्य परीक्षा, सध्याच्या किंवा मागील शाळेचे उतारे, शिक्षकांकडून शिफारस पत्रे द्यावी लागतात. तुम्ही काम करत असल्यास तुमच्या सुपरवायझरचं शिफारस पत्रदेखील गरजेचं असतं.
मान्यताप्राप्त शाळा त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची, शिक्षकवृंदाची, सुविधांची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर देतात. तुम्ही शाळेकडे अभ्यासक्रमाबद्दल विचारणा केल्यास त्यांनी त्याबद्दल सविस्तर माहिती द्यायला हवी. विद्यापीठाची क्रमवारी आणि स्थानिक माध्यमांतून तुम्ही शाळेची वैधता तपासून पाहू शकता. ऑनलाईन मॅप सुविधेच्या माध्यमातून विद्यापीठाचं लोकेशन स्पष्ट दिसायला हवं. त्यांनी विद्यापीठाच्या इमारती आणि परिसराचे फोटो दाखवायला हवेत.
शाळेचा शोध घेताना या गोष्टी आढळल्यास सतर्क व्हा:
- तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला वर्गात उपस्थित राहण्याची गरज नाही असं एजंट किंवा शाळा सांगत असल्यास
- एजंट किंवा शाळा तुम्हाला काही दिवसांत, आठवड्यांत किंवा महिन्यांत पदवी देण्याचं आश्वासन देत असल्यास.
- अभ्यासक्रम पूर्ण होताच किंवा पूर्ण होण्याआधीच एखादी व्यक्ती नोकरी मिळवून देण्याची खात्री देत असल्यास.
- शाळा प्रवेशासाठी अतिरिक्त (सर्वसाधारण अर्ज शुल्कापेक्षा अधिक) शुल्क आकारत असल्यास.
- शाळा तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल समाधानकारक उत्तरं देत नसल्यास किंवा उडवाउडवीची उत्तरं देत असल्यास
- संकेतस्थळाच्या URL चा शेवट .edu नं होत नसल्यास, तुम्हाला कॅम्पसच्या पत्त्याची ऑनलाईन पडताळणी करता येत नसल्यास, शाळेचा पत्ता आणि मेल आयडी वारंवार बदलत असल्यास.
- शाळेचं नाव एखाद्या दुसऱ्या शाळेसारखंच असल्यास, दोन्ही शाळांच्या नावातल्या स्पेलिंगमध्ये थोडा फरक असल्यास.
सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.
फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.