कसा मिळवायचा अमेरिकेचा व्हिसा?
By Admin | Published: April 19, 2017 06:11 AM2017-04-19T06:11:41+5:302017-04-19T12:32:09+5:30
पासपोर्ट हातात मिळाल्यानंतर व्हिसा कसा मिळवायचा याबाबत अनेकांना माहित नसतं, त्यातही भारतीयांना अमेरिकेची भारी हौस.
सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19- पासपोर्ट हातात मिळाल्यानंतर व्हिसा कसा मिळवायचा याबाबत अनेकांना माहित नसतं, त्यातही भारतीयांना अमेरिकेची भारी हौस. परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवायचा हे कित्येकांना माहितच नाही. त्यासाठी आज आम्ही आपल्याला अमेरिकेच्या व्हिसाबाबत माहिती देणार आहोत.
अमेरिकन व्हिसाबाबत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in ही वेबसाइट अत्यंत उत्तम आहे. या वेबसाइटवर सर्व नियम पाहायला मिळतात. सर्व ऑनलाईन भरून प्रिंट काढाव्यात. अमेरिकेत ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांचा पत्ता , त्यांचे निमंत्रण पत्र, बँक स्टेटमेंट, नोकरीची कागदपत्रे, सरकारी नोकरीत असल्यास त्यांचे ना हरकत पत्र (NOC) लागते. धंदा असेल तर इनकम टॅक्स रिटर्न फाईल भरलेले आवश्यक आहे. त्यांच्या वेबसाईट वरच मुलाखतीची तारीख मिळते. त्यात वेळ सुद्धा असते. जमल्यास सर्व नियमांची प्रिंटआऊट काढून जवळ ठेवावी. सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही हातांच्या तर्जनीच्या (अंगठ्या जवळील बोटे) बोटांचे ठसे फिंगर प्रिंट घेतले जातात. जर बोटाला काही जखम झाली असल्यास घरी परत पाठवतात, म्हणून बोटे फार सांभाळावी. विशेष म्हणजे अमेरिकेत जाऊन आपले काम झाल्यानंतर पुन्हा भारतात परतताना अमेरिकन विमानतळावर अस्थलांतरणाच्या (Immigration) वेळेस पुन्हा ठसे पाहतात, म्हणून मधल्या काळात बोटे फार सांभाळावी लागतात.
व्सिसासाठी मुलाखतीला जाताना सर्व कागदपत्रांची फाईल बनवावी. त्यात क्रमाने कागदपत्रे लावावीत. इंटरनेटवरून ज्या अर्जांची प्रिंटआऊट काढल्यात त्यांच्या, पासपोर्टच्यावर सांगितलेल्या कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स काढून ठेवाव्यात. मुलाखत देताना जेवढे विचारतील तेवढ्याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यावीत, अजिबात जास्त, अवास्तव बोलू नये. अनावश्यक माहिती देऊ नये. विचारतील तेवढीच कागदपत्रे दाखवावीत, म्हणून कागदपत्रे नीट लावून घ्यावीत. तेथे शोधत बसू नये. न विचारलेली कागदपत्रे दाखवू नयेत. मुलाखत झाल्यावर व्हिसा मिळाला असल्यास लगेच सांगतात.
अमेरिकेत यापुढे गुणवत्तेवर आधारित स्थलांतर पद्धत स्वीकारण्यात येईल, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनातील भाषणात सांगितले असून त्यामुळे भारतीयांचा फार तोटा होणार नाही असे सूचित होत आहे. उच्च तंत्रज्ञान अवगत असलेल्या भारतासारख्या देशातील व्यावसायिकांना त्यामुळे फायदाच होणार आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतर धोरणाबाबत आधीची कडक भूमिका सोडून नरमाईचा सूर आळवला आहे. अमेरिका प्रथम हे त्यांचे सूत्र अजूनही कायम असले तरी त्यांनी गुणवत्तेवर आधारित स्थलांतर धोरण राबवण्याचे ठरवल्याने त्याचा फायदा आपोआप भारतीय तंत्रज्ञांना होणार आहे.
अमेरिकेच्या व्हिसासाठी मी कधी अर्ज करायला हवा?
- अमेरिकेच्या व्हिसासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा, हे उत्तम! तुमच्या अमेरिका प्रवासाचं नियोजन पक्कं होईपर्यंतही वाट पाहू नये. अमेरिकेत जायचं ठरल्यावर व्हिसाचा अर्ज सर्वात आधी करून ठेवावा. काही प्रकारचे व्हिसा अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ जाऊ शकतो. किंवा अर्जदाराकडून त्यांनी सादर केलेल्या माहितीपेक्षा अधिक माहिती लागू शकते. त्यामुळे वेळेआधीच अर्ज करणं उत्तम! व्हिसा हातात पडल्यानंतरच विमानाची तिकिटं, अमेरिकेतल्या हॉटेलमधली आरक्षणं करावीत.
मला कौटुंबिक कारणासाठी तातडीनं अमेरिकेला जायचं आहे, पण व्हिसासाठीच्या मुलाखतीच्या तारखा पुढचे अनेक दिवस उपलब्ध नाहीत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीच्या व्हिसासाठी लवकरची अपॉइण्टमेंट मला मिळू शकते का?
-हो, अशी व्यवस्था होऊ शकते. अनेकांना तातडीच्या कारणांमुळे प्रवास करावा लागतो. जिथे प्रवासाची व्यवस्था आधी करणं शक्य नसतं अशी काही कारणं / शक्यता व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्ससाठी ग्राह्य धरल्या जातात. तातडीची वैद्यकीय सेवा, अमेरिकेतल्या नातेवाईकाचं अगर अर्जदार ज्याच्या सेवेत आहे अशा व्यक्तीचं अचानक उद्भवलेलं आजारपण याबरोबरच नातेवाइकाचा मृत्यू, अंतिम विधी अशा कारणांसाठी व्हिसाच्या इमर्जन्सी अपॉइण्टमेण्ट्स मिळू शकतात. http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर या प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. मात्र, पूर्वनियोजित व्यावसायिक बैठका, परिषदा, पदवीदान सोहळे, लग्नसमारंभ आदि कारणांसाठी ही सुविधा मिळत नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे भारतातल्या अमेरिकन वकिलातींमध्ये असलेले अपुरे मनुष्यबळ. ‘समर सिझन’मध्ये व्हिसा अपॉइण्टमेंटच्या प्रतीक्षा यादीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
स्टुडण्ट व्हिसा कसा मिळवावा?
उच्च शिक्षणासाठी परदेशी आणि जास्तकरून अमेरिकेत जाणार्या विद्यार्थ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या सर्व विद्यार्थ्यांनाच अमेरिकेत जाण्याचा परवाना म्हणजेच व्हिसा मिळतोच असं नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे अर्जदारांकडून सर्व नियमांचं पालन होत नाही किंवा इतर टेक्निकल कारणं. यावेळेला उच्च शिक्षण घ्यायला अमेरिकेत जाण्यासाठी स्टुडण्टस्नी केलेले अर्ज फेटाळण्यात आले. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे शिक्षणाचा खर्च करण्यासाठी असलेलं अपुरं आर्थिक पाठबळ.
भारतीय लोक लाखो रुपये कमवत असले तरी त्यांची ही कमाई इन्कमटॅक्स रिटर्नच्या स्वरुपात भरलेली दिसून येत नाही. यामुळे अमेरिकेत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या पालकांना उचलता येत नाही असं सिद्ध होतं आणि त्यामुळेच बर्याचशा विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारण्यात येतो.जोपर्यंत आपले पालक आपल्याला उच्च शिक्षण दाखवू शकत नाहीत तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचे व्हिसा नाकारण्यात येणार हे आपल्या मुलांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवू इच्छिणार्या पालकांनी समजून घेतलं पाहिजे.वरील गोष्टीची खबरदारी घेतल्यास स्टुडण्ट व्हिसा मिळवणं मुळीच अवघड नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षणविषयक योजनांविषयी जास्तीत जास्ती माहिती घेणं आवश्यक असतं. कधी कधी व्हिसा ऑफिसरला तुम्ही ती युनिव्हर्सिटी, कोर्स का निवडला याची नीट माहिती द्यावी लागते. करिअर आणि शिक्षणाबद्दल तुम्ही किती गांभीर्याने विचार करता हे जाणून घेण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे तुम्हाला व्हिसा इंटरव्ह्यूचीही विशेष तयारी करावी लागते. तुम्ही निवडलेला कोर्स, युनिव्हर्सिटी, करिअर, त्या क्षेत्रातील संधी याविषयी ठाम मत मांडता आलं पाहिजे. स्टुडण्ट व्हिसा मिळविण्यासाठी कौन्सिलेट ऑफिसला खालील महत्त्वाची कागदपत्रं सादर करावी लागतात.
शैक्षणिक कारकीर्दीतील तुमची कामगिरी, विविध परीक्षांची सर्टिफिकेट, सेट/जीआरई/जीमॅट/ टोफेल/आयइलटीएस यांपैकी उत्तीर्ण परीक्षांची सर्टिफिकेटस्. शिवाय काही ऍचिव्हमेंटस् दाखविणारी कागदपत्रं.तुम्ही शिक्षण अर्धवट सोडून जाणार नाही किंवा अवैधपणे तिथे नोकरी करणार नाही याची खात्री पटवून द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही शिक्षणाचा पूर्ण खर्च करू शकता, हे दाखवणारा आर्थिक उत्पन्नाचा दाखला. तुमचा खर्च स्कॉलरशीप किंवा प्रायोजक करणार असतील तर संबंधित दाखला.तुम्हाला शिक्षणानंतर परदेशात जाऊन सेटल होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला स्टुडण्ट व्हिसा मिळणं कठीण जातं. त्यामुळे तुमच्या मातृभूमीशी तुमचं असणारं जिव्हाळ्याचं दृढ नातं, मायदेशी येण्याची ओढ व्हिसा ऑफिसरला जाणवली पाहिजे.फॉरेनमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मातृभूमीत परतून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, त्याचा नीट विचार करा आणि त्याबद्दल व्हिसा ऑफिसरला सविस्तर माहिती द्या. भविष्यकाळासाठी काही ठोस योजना तुमच्या मनात असणं अत्यंत गरजेचं आहे.मातृभूमीत परत आल्यानंतर कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात, याबद्दल माहिती करून द्या. तुम्ही निवडलेल्या कोर्समधून चांगला जॉब मिळू शकतो हे पटवून देणं तुम्हाला पटकन स्टुडण्ट व्हिसा मिळण्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरतं.
-फॉर्मल ड्रेसिंग असावं.
-आवश्यक असणारी सर्व कागदपत्र, त्यांच्या प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत याप्रमाणे जवळ ठेवा.
-वेळेच्या आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा.
-तुमचे विचार स्पष्ट व मोकळेपणाने मांडा.
-व्हिसा ऑफिसरने विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासपूर्वक उत्तरं द्या.
-संपूर्ण शैक्षणिक फी भरून त्याची पावती सादर केलीत तर उत्तम.
-कोर्स का निवडलात, त्याची कारणं, तुमच्या शिक्षणाचा भारताला होणारा उपयोग हे व्यक्त करणारं एक स्टेटमेण्ट ऑफ परपज लिहा.
व्हिसा देण्याची प्रक्रिया प्रत्येक देशासाठी वेगळी असते. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत द्यावीच लागते. पण इंग्लंडचा व्हिसा मिळवण्यासाठी योग्य कागदपत्र पुरेशी असतात. काही ठराविक विद्यार्थ्यांना मुलाखत द्यावी लागते.
मी अमेरिकी नागरिकाशी लग्न करणार आहे. त्यानंतर आमचा अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार आहे. मी स्थलांतराची तयारी कशी करावी?
तुम्ही भारतात लग्न करून नंतर अमेरिकेत येणार आहात का? की अमेरिकेत स्थलांतरित झाल्यानंतर लग्न करणार आहात...
जर तुम्ही भारतात लग्न करणार असाल तर अमेरिकेतील तुमच्या जोडीदाराने सर्वप्रथम सशर्त रहिवासी व्हिसा साठी अर्ज करावा ज्याला CR-1 व्हिसा असंही म्हटलं जातं. या व्हिसावर अमेरिकेत आल्यास तुम्हाला आपोआप तुम्ही अमेरिकेचे सशर्त नागरिक व्हाल आणि तुम्हाला 2 वर्षांसाठी ग्रीन व्हिसा मिळेल. दोन वर्षांचा कालावधी संपायच्या 3 महिने आधी तुम्ही अटी काढून अमेरिकेच्या विनाअट स्थायी व्हिसासाठी अर्ज करू शकतात. याला LPR असंही म्हटलं जातं.
जर तुम्ही अमेरिकेत येऊन नंतर लग्न करणार असाल तर अमेरिकेती तुमच्या जोडीदाराने व्हिसासाठी अर्ज करावा ज्याला K-1 व्हिसा असंही म्हटलं जातं. हा व्हिसा मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत जोडीदारासोबत लग्न करणं बंधनकारक आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही अमेरिकेच्या स्थायी व्हिसासाठी (LPR) अर्ज करू शकतात. LPR व्हिसा मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो पण एकदा मिळाल्यानंतर तुम्ही लगेच अमेरिकेचे स्थायी नागरिक होतात.