ग्रीन कार्डधारकाला किती दिवस अमेरिकेबाहेर वास्तव्य करता येतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 12:21 PM2020-05-16T12:21:51+5:302020-05-16T12:22:21+5:30
ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेबाहेर वास्तव्य करण्याचे काही नियम आहेत. ते न पाळल्यास रहिवासी म्हणून दिलेला दर्जा धोक्यात येऊ शकतो.
प्रश्न- माझी आई ग्रीन कार्डधारक असून ती माझ्यासोबत भारतात राहते. ती गेल्या नऊ महिन्यांपासून अमेरिकेच्या बाहेर आहे. ती किती दिवस अमेरिकेच्या बाहेर राहू शकते?
उत्तर- सध्याच्या नियमांनुसार, अमेरिकेच्या कायदेशीर कायम रहिवाशाला (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकाला ३६४ दिवसांत अमेरिकेत परतावं लागतं. एखाद्या व्यक्तीनं परदेशात जाण्यापूर्वी पुनर्प्रेवेशाचा परवाना घेतला असल्यास वरील नियम लागू होत नाही. संबंधित व्यक्तीला पुनर्प्रेवेशाचा परवाना यूएससीआयएसकडून (फॉर्म-१३१) मिळतो. पुनर्प्रेवेशाचा परवाना घेतला असल्यास संबंधित व्यक्तीला पुनर्प्रेवेशाचा परवान्याची वैधता संपण्यापूर्वी अमेरिकेत परतावं लागतं. तुमची आई अमेरिकेबाहेर केव्हा पडली ती तारीख आणि तिच्याकडे पुनर्प्रेवेश परवाना आहे का, ते तपासून पाहा. तुमची आई भारतात किती दिवस राहू शकते, याची माहिती यामधून तुम्हाला मिळेल.
सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी काळ अमेरिकेबाहेर असलेल्या ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेत परतण्याची परवानगी आहे. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे प्रवासाची कागदपत्रं (पासपोर्ट किंवा अमेरिकेतील वाहन चालक परवाना) हवीत. जर ते पुनर्प्रेवेश परवान्याच्या सहाय्यानं परतणार असतील, तर त्यांचा पुनर्प्रेवेश परवाना वैध असायला हवा.
अमेरिकेच्या बाहेर जाण्याआधी पुनर्प्रेवेश परवाने मिळवणं गरजेचं असतं. अमेरिकेत असतानाच पुनर्प्रेवेश परवान्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. कोणत्याही वैध पुनर्प्रेवेश परवान्याशिवाय एक वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिकेबाहेर वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर रहिवासी म्हणून देण्यात आलेली मान्यता धोक्यात येऊ शकते.
याबद्दच्या अधिक माहितीसाठी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या संकेतस्थळाला भेट द्या.