टुरिस्ट व्हिसा असल्यास अमेरिकेत किती दिवस मुक्काम करता येतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:52 PM2020-03-28T14:52:35+5:302020-03-28T14:53:56+5:30
अमेरिकेत प्रवेश करताना तुम्ही किती मुक्काम करू शकता, त्याची माहिती दिली जाते.
प्रश्न- मला उन्हाळ्यात अमेरिकेत असलेल्या माझ्या मुलाच्या भेटीसाठी जायचंय. माझा मुलगा एच१बी व्हिसावर मिशिगनमध्ये काम करतो. मी भारतीय नागरिक असून मला नुकताच अमेरिकेचा टुरिस्ट व्हिसा मिळालाय. त्याची वैधता १० वर्षे आहे. मला किती काळ अमेरिकेत राहता येऊ शकेल?
उत्तर: अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसाची मुदत आणि तुम्ही एकावेळी अमेरिकेत करत असलेल्या मुक्कामाचा कालावधी यात फरक आहे.
दुतावास किंवा वकिलातीनं दिलेला व्हिसा तुम्हाला अमेरिकेत प्रवेश करताना (विमानतळ, बंदर, जमिनीवरील सीमा) कामी येतो. या ठिकाणी सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण (सीबीपी) अधिकारी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही, याबद्दल अंतिम निर्णय घेतात. तुम्ही अमेरिकेत किती काळ राहू शकता, याचा निर्णयदेखील तेच घेतात. त्यानंतर तुमच्या पासपोर्टवर निळ्या रंगाचा शिक्का मारला जातो. तुम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकता, याची तारीखदेखील त्यावर असते.
ही तारीख तुमच्या टुरिस्ट व्हिसावर देण्यात आलेल्या तारखेपेक्षा वेगळी असू शकते. ती तारीख तुमच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरचीही असू शकते. व्हिसाची वैधता संपायच्या दिवशीही तुम्ही अमेरिकेत प्रवेश करू शकता.
अमेरिकेत प्रवेश करताना सीबीपी अधिकाऱ्यानं निळ्या शिक्क्यासोबत नमूद केलेल्या तारखेपर्यंत तुम्ही वास्तव्य करू शकता. अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसाच्या मदतीनं तुम्ही कायम वास्तव्य करू शकत नाही आणि नोकरीदेखील मागू शकत नाही.
सीबीपी अधिकाऱ्यानं दिलेल्या तारखेनंतरही तुम्ही अमेरिकेत राहिल्यास तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. अमेरिका सोडण्यासाठी देण्यात आलेली तारीख निघून गेल्यावरही बरेच दिवस तुम्ही मुक्काम केल्यास भविष्यातील व्हिसासाठी तुम्ही अवैध ठरू शकता. वैद्यकीय किंवा इतर महत्त्वाच्या कारणांमुळे तुम्हाला जास्त दिवस राहावं लागणार असल्यास युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसकडून (यूएससीआयएस) परवानगी घेण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. तुम्हाला अमेरिकेतल्या मुक्कामाचा कालावधी वाढवून हवा असल्यास आय-५३९ अर्ज करा किंवा नॉनइमिग्रंट स्टेटसची मुदत बदलण्यासाठी/वाढवण्यासाठी अर्ज करा. अमेरिकेतील तुमचा वैध मुक्काम संपण्याच्या ४५ दिवस आधी तुम्हाला हा अर्ज करावा लागतो.