पाकिस्तानातील हिंदूंवर अजून किती काळ अत्याचार चालणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:13 AM2019-09-19T06:13:51+5:302019-09-19T06:14:02+5:30
पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे. त्यांच्यावर बलात्कारही होतात. हे अत्याचार थांबणार तरी कधी असा परखड सवाल पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट)चे नेते खेलदास कोहिस्तानी यांनी नॅशनल असेम्ब्लीत मंगळवारी विचारला.
गेल्या चार महिन्यांत पाकिस्तानातील २५ ते ३० हिंदू मुलींचे अपहरण झाले आहे. त्या पुन्हा कधीच घरी परत आल्या नाहीत. पाकिस्तानातील हिंदूंची मंदिरे यापुढेही उद््ध्वस्त होत राहतील का? अजून किती काळ हिंदूंच्या हत्या होणार आहेत? असे सवाल करून कोहिस्तानी म्हणाले की, हिंदूंवर अत्याचार करण्याचे प्रकार सिंध प्रांतातील उमरकोट, घोटकी येथेच का घडत आहेत? हा वणवा साऱ्या सिंध प्रांतात पसरण्याची शक्यता असल्याने वेळीच त्याला रोखले पाहिजे. सिंध प्रांतातील काही लोकांना पाकिस्तान सरकारने अटक झाली पाहिजे.
पाकिस्तानमधील अल्पसंख्याक सुरक्षित असल्याची ग्वाही तेथील सरकारने अनेकदा दिली. मात्र, वस्तुस्थिती निराळीच आहे. घोटकी शहरातील रहिवासी असलेली व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी नम्रिता चंदानी हिचा मृतदेह वसतिगृहातील तिच्या खोलीत नुकताच आढळून आला.
काश्मीरमध्ये भारत मानवी हक्कांची गळचेपी करीत आहे असा कांगावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जिनिव्हा येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीच्या ४२ व्या परिषदेत केला होता. त्यानंतर काही दिवसांनीच नम्रता चंदानी हत्या प्रकरण
घडले. (वृत्तसंस्था)
>अहमदिया, शियांचाही छळ
पाकिस्तान अल्पसंख्याकांवर होणाºया अत्याचाराचा भारतातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून नेहमीच निषेध केला आहे, तसेच आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन, शीख यांचे जबरदस्तीने धर्मांतर करणे, अहमदिया, शियांचा छळ करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची वेळप्रसंगी हत्या केली जाते. त्यांच्या मुलींवर बलात्कारही केला जातो, असे आरोप होत आहेत.