सुनीताचे अंतराळातील वेतन, ओव्हरटाइम अन् भत्ते किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:08 IST2025-03-18T10:06:08+5:302025-03-18T10:08:14+5:30
२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे.

सुनीताचे अंतराळातील वेतन, ओव्हरटाइम अन् भत्ते किती?
वॉशिंग्टन : फक्त आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना तांत्रिक अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अडकून पडावे लागले. नऊ महिन्यांहून अधिक काळापासून ते आयएसएसवर अडकले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ या अंतराळ यानाने आयएसएसवर पाऊल ठेवले आहे. परवा, दि. १९ मार्च रोजी हे दोघे पृथ्वीवर परत येतील, असे सांगण्यात येत आहे.
२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे.
अंतराळवीरांना नेमका किती मिळतो दैनिक भत्ता?
नासाच्या माजी अंतराळवीर कॅडी कोलमन यांच्यानुसार, अंतराळवीरांना ‘ओव्हरटाइम’ मिळत नाही. फेडरल कर्मचारी असल्यामुळे ते अंतराळात जितका वेळ राहतात तो वेळ पृथ्वीवरील वेळेसारखाच सामान्य कामाच्या तासांचा काळ समजला जातो. अंतराळातील खाण्यापिण्याची व्यवस्था आणि खर्च नासामार्फत केला जातो. अंतराळातील वास्तव्यादरम्यान त्यांना अवघा ३४७ रुपये प्रतिदिन दैनिक भत्ता मिळतो.
२०१०-११ मध्ये कोलमन या १५९ दिवसांच्या मिशनवर अंतराळ स्थानकावर होत्या. यादरम्यान त्यांना एकूण ६३६ डॉलर (५५ हजार रुपये) दैनिक भत्ता प्राप्त झाला.
हा हिशेब लावला तर सुनीता आणि बुच यांना २८७ दिवसांसाठी १,१४८ डॉलर (एक लाख रुपये) ‘ओव्हरटाइम’ मिळू शकतो.
दोन्ही अंतराळवीरांना इतके मिळेल एकूण वेतन...
दोन्ही अंतराळवीरांना जीएस १५ पे ग्रेड लागू आहे. फेडरल कर्मचाऱ्यांचा हा सर्वांत वरिष्ठ पे ग्रेड आहे. या पे ग्रेड अंतर्गत त्यांना वार्षिक १ लाख २५ हजार १३३ ते १ लाख ६२ हजार ६७२ डॉलर (सुमारे १.०८ कोटी ते १.४१ कोटी रुपये) वेतन मिळते. आता २८७ दिवसांसाठी त्यांना सुमारे ८१ लाख ते १.०५ कोटी रुपये संभाव्य वेतन मिळू शकते.