चांदोमामाचे वयोमान किती? तुम्हाला माहीत आहे का? अपोलो-१७ ने आणलेल्या मातीवरून उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:41 AM2023-10-26T05:41:03+5:302023-10-26T05:41:35+5:30
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठ आणि इंग्लंडमधील ग्लास्गो विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा शोधप्रबंध जारी केला.
शिकागो : चंद्राचे वय किती असेल, यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जातात. वेगवेगळे दावेही केले जातात. परंतु १९७२ मध्ये अमेरिकेने चंद्रावर पाठविलेल्या अपोलो-१७ मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणलेल्या मातीच्या विश्लेषणावरून चंद्राचे वयोमान काढण्यात आले. त्यानुसार ते जवळपास ४.४६ अब्ज वर्षे असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठ आणि इंग्लंडमधील ग्लास्गो विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा शोधप्रबंध जारी केला.
कशी झाली चंद्राची निर्मिती?
मंगळाच्या आकाराच्या ग्रहाची पृथ्वीशी झालेल्या धडकेतून निर्माण झालेल्या ऊर्जेतून वितळलेले खडक आणि गुरुत्वाकर्षण शक्तीने बाहेर पडलेली वस्तू म्हणजे चंद्र होय. परंतु, ही धडक आणि चंद्राची नेमकी निर्मिती कधी झाली हे मात्र अद्याप कोडेच असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
चंद्राच्या मातीत काय आढळले?
अपोलो-१७ मधील अंतराळवीरांनी आणलेल्या मातीचे विश्लेषण केले असता, त्यात प्रामुख्याने ‘झिक्रॉन’ हे खनिज द्रव्य आढळले.चंद्राची निर्मिती झाल्यावर सुरुवातीला पृष्ठभाग द्रवरूपात होते, टप्प्याटप्प्याने पृष्ठभाग स्थायूरूपात परावर्तित झाल्यानंतर चंद्रावरील पहिले स्थायू घटक ‘झिक्रॉन’ असल्याचे आढळले. त्यावरून चंद्राचे वयोमान काढण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.
४.४२ अब्ज वर्षे चंद्राच्या वयाचा आतापर्यंतचा अंदाज, ४.४६ अब्ज वर्षे नव्या संशोधनानुसार वयोमान