अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठीची मुलाखत कशी निश्चित करावी? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 01:09 PM2021-06-12T13:09:49+5:302021-06-12T13:10:49+5:30
अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून, ती मुलाखतीवर आधारित आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
प्रश्न: मी पहिल्यांदाच स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करत आहे. मी व्हिसासाठीची मुलाखत कशी निश्चित करावी? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
उत्तर: अमेरिकेतील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठ, खासगी माध्यमिक शाळा किंवा इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. १ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यानंतर अभ्यासक्रम सुरू होत असलेल्या विद्यार्थ्यांनी व्हिसा मुलाखतीसाठी ६० दिवस आधी अर्ज करावा. असे विद्यार्थी त्यांची शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ सुरू होण्याच्या ३० दिवस आधी अमेरिकेसाठी प्रयाण करू शकतात.
व्हिसा मुलाखतीसाठी वैध पासपोर्ट, डीएस-१६० (व्हिसा अर्ज) कन्फर्मेशन पेज, अमेरिकेतील तुमच्या शाळेकडून किंवा संस्थेकडून मिळालेला वैध आय-२० अर्ज आणि सेविस फी पेमेंटच्या पुराव्याची आवश्यकता असते.
अर्जदारांना त्यांची आर्थिक योजना दूतावासातील अधिकाऱ्याला तोंडी सांगावी लागते. मात्र मुलाखतीवेळी कोणत्याही आर्थिक कागदपत्रांची गरज नसते. तुम्ही पहिल्या शैक्षणिक वर्षाचा खर्च कसा करणार आणि उर्वरित वर्षांसाठीचा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे याची माहिती व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला दूतावासातील अधिकाऱ्याला द्यावी लागते. पहिल्या वर्षासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम आय-२० फॉर्मवर नमूद केलेली असते. त्यात शैक्षणिक आणि वास्तव्यासाठी येणाऱ्या खर्चाचा समावेश असतो.
अधिकाऱ्याला अतिरिक्त कागदपत्रं हवी असल्यास, तो किंवा ती अर्जदाराला मुलाखतीनंतर कागदपत्रं सादर करण्यासाठी संधी देते.
अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून, ती मुलाखतीवर आधारित आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
कोविड-१९ ची दुसरी लाट आल्यानं आमच्या दूतावासाकडून सध्या केवळ मर्यादित स्वरुपाच्या व्हिसा सुविधा पुरवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या व्हिसांना आम्ही प्राधान्य देत आहोत. आमचे कर्मचारी आणि ग्राहक यांना सुरक्षित ठेवून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार येत्या आठवड्यांत आम्ही अपॉईंटमेंटच्या संख्येत वाढ करत राहू. अपॉईंटमेंटच्या उपलब्धतेबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.