Howdy Modi: इस्लामिक कट्टरतावादाचा एकत्र सामना करू; ट्रम्प यांचा पाकिस्तानवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:29 AM2019-09-23T00:29:29+5:302019-09-23T00:33:10+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक
ह्युस्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत एक मजबूत देश म्हणून वाटचाल करत असल्याचे कौतुकोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले. मोदींमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले असल्याचं ते म्हणाले. उज्ज्वल भविष्य हे दोन्ही देशांचं स्वप्न आहे. दोन्ही देश इस्लामिक कट्टरतावादाचा मिळून सामना करतील, असंदेखील ट्रम्प म्हणाले. यानंतर ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या 50 हजार अनिवासी भारतीयांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
इस्लामिक कट्टरतावादावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. कट्टरतावादी इस्लामिक दहशतवादापासून निर्दोष लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दोन्ही देश एकत्रितपणे दहशतवादाशी दोन हात करतील, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात सीमा सुरक्षेचाही उल्लेख केला. दोन्ही देशांनी त्यांच्या सीमा सुरक्षित करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी दोन्ही देश एकत्रित पावलं उचलतील, असं ट्रम्प म्हणाले. पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे.
17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस झाला. त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदींना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळात 30 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले. त्यांनी केलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे, अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. भारत आणि अमेरिकेच्या संविधानातही बरंच साम्य असल्याचं ते म्हणाले. मोदी व्हाईट हाऊसचे अतिशय विश्वासू मित्र आहेत. मोदींना ट्रम्पपेक्षा चांगला मित्र मिळणार नाही, असंदेखील ट्रम्प यांनी पुढे म्हटलं.