Howdy Modi: 'मोदींच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न भारत घडताना पाहत आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:40 AM2019-09-23T04:40:42+5:302019-09-23T06:44:01+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे गौरवोद्गार
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे सर्वात मोठे आणि सर्वात सच्चे मित्र आहेत, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींबाबत गौरवोद्गार काढले. ह्यूस्टनमधील खचाखच भरलेल्या एनआरजी स्टेडियममधील नागरिकांना ट्रम्प यांनी संबोधित केले.
ट्रम्प म्हणाले की, मोदी हे भारतासाठी असामान्य काम करत आहेत. गत महिन्यात ६९ वर्षांचे झालेल्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न आणि सार्वभौम भारत पहात आहे. आज आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. लोकशाहीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून ट्रम्प म्हणाले की, आपल्या राष्ट्राला पहिल्यापेक्षा अधिक समृद्ध बनविण्यासाठी मोदींसोबत काम करण्यासाठी आपण तत्पर आहोत.
ट्रम्प म्हणाले की, संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच संरक्षण करारांवर स्वाक्षरी केली जाईल. सीमा सुरक्षा अमेरिका आणि भारत दोघांसाठी महत्वाची आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनआरजी स्टेडियमवर भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही हात जोडून मोदी व्यासपीठावर पोहोचले.
कार्यक्रमात स्पर्श शहाचे राष्ट्रगीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात स्पर्श शहा (१६) या युवकाने रविवारी राष्ट्रगीताचे गायन केले. अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणारा स्पर्श हा भारतीय वंशाचा आहे. शहा याला जन्मत:च ठिसूळ हाडांचा आजार (ऑस्टेओजिनिसिस इर्म्पफेक्टा) आहे.
त्याला चाकांच्या खुर्चीतच बसून राहावे लागते. स्पर्श शहा याने तोंड देत असलेली प्रतिकूलता कला जोपासण्यात अडथळा ठरू दिली नाही. स्पर्श हा गायक, गीतलेखक आणि प्रेरणादायी वक्ता आहे.
वैष्णव जन तो...
मोदी यांच्या भाषणापूर्वी अमेरिकेतील भारतीयांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त हे भजन गायले गेले.