गॅरेजमधून झाली HP ची सुरुवात, दोन मित्रांनी मिळून अशी उभारली IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 04:19 PM2022-12-06T16:19:54+5:302022-12-06T16:21:25+5:30
अमेरिकेत शिकत असताना दोन मुलं भेटली. या भेटीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं आणि त्यांनी मिळून आयटी कंपनी HP चा पाया रचला.
अमेरिकेत शिकत असताना दोन मुलं भेटली. या भेटीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं आणि त्यांनी मिळून आयटी कंपनी HP चा पाया रचला. विल्यम रेडिंग्टन हेवलेट आणि डेव्हिड पॅकार्ड असं त्या दोन मित्रांचं नाव. दोघांच्या आडवाचं पहिलं आद्याक्षर एकत्र करुन HP म्हणजेच Hewlett Packard असं कंपनीचं नाव ठेवलं गेलं. जी अमेरिकेची बहुराष्ट्रीय कंपनी बनली. त्याचं मुख्यालय कॅलिफोर्नियात आहे. या कंपनीनं आयटी जगतात अनेक गोष्टींचा शोध लावला ज्यामुळे मानवी जीवन सुकर झालं.
विल्यम हेवलेट यांचा जन्म २० मे १९१३ रोजी अमेरिकेतील मिशिगन येथे झाला. त्यांचे वडील मिशिगन विद्यापीठात प्राध्यापक होते. विल्यम यांनी सुरुवातीचं शिक्षण कॅलिफोर्नियामधून पूर्ण केलं. यादरम्यान त्यांना डिस्लेक्सियाचा त्रास जाणवू लागला. जो एक प्रकारचा लर्निंग डिसऑर्डर आहे आणि यात रुग्णाला वाचण्यात त्रास होतो. परिणामी, विल्यम यांना लिहिणं आणि वाचणं कठीण झालं. हा रोग विल्यमला त्रास देत होता, परंतु त्यांचा हेतू ठाम होता. विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत त्यांची स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी होती.
रेडिओ तयार करुन दिलं सरप्राईज
७ सप्टेंबर १९१२ रोजी कोलोरॅडो यूएसए येथे जन्मलेल्या डेव्हिड पॅकार्ड यांनी लहानपणापासूनच आपल्या बुद्धिमत्तेनं पालक आणि शिक्षकांना प्रभावित केलं होतं. हायस्कूलमध्ये त्यांनी रेडिओ बनवून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. १९३० मध्ये, डेव्हिडने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इथेच त्यांची विल्यम हेवलेट यांच्याशी भेट झाली. दोघांनीही फ्रेडरिक टर्मन यांच्याकडे शिक्षण घेतलं, ज्यांना सिलिकॉन व्हॅलीचे जनक म्हटलं जातं. दोघांनीही फ्रेडरिकसोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, दोन्ही मित्रांनी आपला स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला.
कंपनीचं नाव ठरवण्याआधी केला 'टॉस'
विशेष म्हणजे कंपनीचं नाव HP असं ठरवण्यापू्र्वी नाणेफेकमध्ये जो जिंकेल त्याचं आडनाव आधी लिहिले जाईल, अशी पैज लावण्यात आली. हेवलेटने पैज जिंकली आणि अशा प्रकारे कंपनीचे नाव हेवलेट पॅकार्ड (HP) ठेवण्यात आलं. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीची सुरुवात गॅरेजमधून झाली. कंपनी अधिकृतपणे १ जानेवारी १९३९ रोजी कॅलिफोर्नियामध्ये ४४ हजार रुपयांच्या भांडवलानं सुरू झाली. डेविडच्या घरामागील एका गॅरेजमध्ये दोघांनी आपल्या नव्या कंपनीची सुरुवात केली होती.
जगातील पहिला साइंटिफिक कॅल्क्युलेटर बनवला
१९६१ मध्ये एचपीने सॅनबॉर्न कंपनी विकत घेतली आणि वैद्यकीय उपकरणं तयार करण्यास सुरुवात केली. जगातील पहिले साइंटिफिक कॅल्क्युलेटर बनवण्याचं श्रेय HP कंपनीला जातं. कंपनीनं अॅटॉमिक क्लॉक बनवलं, ज्यानं एका सेकंदाच्या दहा लाखव्या भागाचीही माहिती दिली. HP ने Apollo आणि Convex संगणक विकत घेतले आणि १९९६ मध्ये मिनी कॉम्प्युटरची निर्मिती केली.
जगातील पहिला पर्सनल कॉम्युटर बनवला
१९६८ मध्ये HP ने जगातील पहिला वैयक्तिक संगणक बनवला ज्याला Hewlett-Packard 9100A असे नाव देण्यात आले. यानंतर कंपनीनं एकापेक्षा एक उत्पादनं तयार करून इतिहास रचला. मे 2022 मध्ये कॉम्पॅक आणि एचपी विलीन झाले आणि कंपनीचे नाव HPQ म्हणजेच Hewlett Packard & Compaq असे ठेवण्यात आले. जरी हे विलीनीकरण व्यवसायाच्या दृष्टीने चांगले सिद्ध झाले नाही. कंपनीनं आपल्या नफ्यातील काही भाग कर्मचाऱ्यांनाही द्यायला सुरुवात केली. HP ने उत्पादनांमध्ये नावीन्य आणण्याचे जे ध्येय ठेवलं आहे ते आजही कायम आहे. हेच कारण आहे की ८ दशकांनंतरही एचपी आयटी क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी राहिली आहे.