रोहिंग्यांना कॉक्स बझारमधून सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 03:05 PM2018-08-06T15:05:44+5:302018-08-06T15:08:03+5:30
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलातंर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे.
कॉक्स बझार (बांगलादेश)- बांगलादेशातील कॉक्स बझारमध्ये छावणीमध्ये राहाणाऱ्या रोहिंग्यांना तात्काळ सुरक्षित जागी हलवले पाहिजे असे निरीक्षण ह्युमन राइट्स वॉच संस्थेने नोंदवले आहे. सध्या या छावण्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक राहात आहेत.
Tens of thousands of Rohingya refugees in camps in Bangladesh are at imminent risk of landslides. pic.twitter.com/pRatk01vTJ
— Jan Kooy (@KooyJan) August 6, 2018
या रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल ह्युमन राइटस वॉच संस्थेने 68 पानांचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पावसाळ्यामध्ये पूर तसेच दरड कोसळण्याचा या रोहिंग्यांना मोठा धोका आहे तसेच संसर्गजन्य रोग, आग, सामूहिक तणाव, घरगुती व लैंगिक छळ अशी संकटे येथे उभी असल्याची माहिती ह्युमन राइटस वॉचने दिली आहेत. रोहिंग्याला भक्कम आश्रयस्थान, शिक्षणाची सोय दिली पाहिजे असेही या अहवालात म्हटले आहे. बांगलादेश इज नॉट माय कंट्री- द प्लाइट ऑफ रेफ्युजीस फ्रॉम म्यानमार असे या अहवालाचे नाव आहे. या लोकांना उखिया येथील मोठ्या छावणीत पाठवावे अशी सूचना त्यात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलातंर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे. कुतापलाँग-बालुखाली या छावणीमध्ये 6 लाख 26 हजार लोक राहात असून जगातील सर्वात मोठी छावणी म्हणून ती ओळखली जात आहे. येथे अत्यंत कमी जागेत जास्त लोक सामावले असून प्रत्येक व्यक्तीला 10.7 चौ. मी इतकी जागा राहाण्यासाठी मिळत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमा 45 चौ. मी जागा उपलब्ध असली पाहिजे. यातील 2 लाख रोहिंग्यांना पूर आणि दरडींचा त्रास सहन करावा लागू शकतो.