भारताचा शत्रू हाफीज सईदवर अमेरिकेने आणले निर्बंध
By admin | Published: May 12, 2017 06:13 PM2017-05-12T18:13:19+5:302017-05-12T18:20:03+5:30
दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा बंद व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12 - दहशतवादी संघटनांना मिळणारा पैसा बंद व्हावा यासाठी अमेरिकेने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर निर्बंध आणले आहेत. यामध्ये हाफीज सईदची लष्कर-ए-तोएबा आणि जमात उद दावा या संघटनांचा समावेश आहे. लष्कर-ए-तोएबाने मुंबई 26/11 हल्ल्यासह भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. जमता उद दावाच्याआडून हाफीजने समाजसेवकाचा मुखवटा धारण केला आहे.
या संघटनांचे पैसे उभारण्याचे नेटवर्क मोडून काढण्याच्या उद्देशाने अमेरिकेने हे निर्बंध आणले आहेत. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, आयएसआयएस खोरसाना या संघटनांचाही निर्बंधांमध्ये समावेश आहे.
पाकिस्तानातून तालिबान, अलकायदा, आयएसआयएस आणि लष्कर-ए-तोएबा या संघटनांना भरती आणि आत्मघातकी हल्ल्यांसाठी जी रसद मिळतो ती तोडण्यासाठी अमेरिकेने हे निर्बंध घातले आहेत अशी माहिती परदेशी संपत्ती नियंत्रण विभागाचे संचालक जॉन स्मिथ यांनी दिली. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांविरोधात अमेरिका आपली मोहिम सुरु ठेवणार आहे. समाजसेवेच्याआडून या संघटना दहशतवादासाठी पैसा गोळा करतात असे स्मिथ म्हणाले.
दरम्यान अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने सईदवर काही प्रमाणात नियंत्रण आणले आहे. मागच्या महिन्यात हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने लाहोर उच्च न्यायालयामध्ये यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले. हाफिजचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
मध्यंतरी पाकिस्तानने त्या देशातील अनेकांची सुरक्षा व्यवस्था कमी केली होती. त्यात हाफिजचाही समावेश होता. सुरक्षा कमी केल्यावर त्याला लगेचच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुरक्षित ठेवण्यासाठीच त्याला नजरकैदेत ठेवल्याची टीकाही अनेकांनी पाक सरकारवर केली होती. अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे.