Setback for Pakistan, FATF : पाकिस्तानच्या आशांना जबर धक्का! बदनाम Grey List मधून अजूनही काढलं गेलं नाही नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:38 PM2022-06-17T22:38:38+5:302022-06-17T22:40:59+5:30
पाकिस्तानचं नाव बदनाम यादीतून कधी काढलं जाणार... वाचा सविस्तर
Setback for Pakistan दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी लागणारी यंत्रणा विकसित करण्याच्या आघाडीवर पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. ग्लोबल टेरर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने नमूद केले आहे की पाकिस्तानला अद्याप तरी तातडीने 'ग्रे लिस्ट' (Gray List) मधून काढले जाणार नाही. पाकिस्तानात जाऊन ऑनसाईट भेटीनंतरच या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.
FATF ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने दोन कृती योजना (action plans) तयार केल्या आहेत. या सुधारणांची नीट अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि त्यात सातत्य आहे की नाही हे ऑनसाइट भेट देऊनच व्हेरिफाय करणे शक्य आहे. त्याप्रमाणेच भविष्यात देखील या कृती योजनांची सातत्यपूर्ण अमलबजावणी होते की नाही, आणि सुधारणा टिकवण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय बांधिलकी कायम राहते की नाही हेदेखील ऑनसाईट जाऊन पाहावे लागेल. मात्र, FATF ने पाकिस्तानने दहशतवादाविरोधात केलेल्या कृती योजनांचे स्वागत केले आहे. याशिवाय ३४ अॅक्शन पॉइंट्सवरही केलेल्या कारवाईचा स्वीकार करण्यात आला आहे.
ऑनसाईट तपासणीत काय पाहिलं जाणार?
जेव्हा FATF पुनरावलोकन व तपासणी करते, तेव्हा कृती आराखडा आणि देशाने केलेल्या कृतींची ऑनसाईट तपासणी केली जाते. यामध्ये FATF ची एक टीम त्या देशाला भेट देते आणि त्या देशाने उचललेली पावले कायमस्वरूपी आणि प्रभावी आहेत की नाही याचे मूल्यांकन करते. यानंतर, FATF त्या देशाला 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर काढण्याबाबतचा निर्णय घेते.
मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आश्रय आणि निधी पुरवणे, या कारणांमुळे पाकिस्तान 'ग्रे लिस्ट'मध्ये आहे. २०१८ पासून FATF च्या 'ग्रे लिस्ट'मध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन त्यावर कृती आराखडा तयार करण्यास पाकिस्तानला ऑक्टोबर २०१९ पर्यंतचा वेळ देण्यात आला होता. पण त्यातही पाकिस्तान अयशस्वी ठरले. त्यामुळे अद्यापही पाकिस्तान 'ग्रे लिस्ट'मध्ये कायम आहे.