मिठी मारली, काकूने १२ वर्षाच्या पुतण्याकडे १ लाख डॉलर्सची भरपाई मागितली
By admin | Published: October 14, 2015 12:09 PM2015-10-14T12:09:31+5:302015-10-14T12:09:48+5:30
वाढदिवसाच्या पार्टीत काकीला मिठी मारणे १२ वर्षाच्या चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मिठी मारताना त्या मुलाची काकू खाली पडली व तिच्या हाताला दुखापत झाली.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १४ - वाढदिवसाच्या पार्टीत काकूला मिठी मारणे १२ वर्षाच्या मुलाला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मिठी मारताना त्या मुलाची काकू खाली पडली व तिच्या हाताला दुखापत झाली. या दुखापतीमुळे प्लेटही उचलता येत नसल्याने मुलाने १ लाख २७ डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधीत महिलेने केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करणा-या ५४ वर्षीय जेनिफर कॉनेल यांचा पुतणा शेन हा वेस्टपोर्ट येथे राहतो. १८ मार्च २०११ रोजी शेनचा आठवा वाढदिवस होता व यानिमित्त त्याला एक सायकल भेट म्हणून मिळाली होती. शेनच्या वाढदिवसानिमित्त त्याची काकू जेनिफर कॉनेल या त्याच्या घरी गेल्या होता. काकूला बघताच शेन आनंदित झाला व त्याने पळत जाऊन काकूला मिठी मारली. मात्र या दरम्यान शेन व जेनिफर हे दोघेही जोरात खाली पडले व जेनिफर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
घटनेच्या चार वर्षानंतर जेनिफर यांनी स्थानिक न्यायालयात शेनविरोधात नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे. पुतण्या शेनवर माझे प्रेम असले तरी माझ्या दुखापतीसाठी त्यालाच जबाबदार भरले पाहिजे. मला गंभीर दुखापत झाल्याचे घटना घडली त्याच दिवशी लक्षात आले होते. पण पार्टीत बेरंग होऊ नये म्हणून मी काहीच बोलले नाही. गेल्या आठवड्यात एका पार्टीला गेली असताना मला प्लेटही उचलता येत नव्हती. म्हणून मी याचिका दाखल केली असे जेनिफर यांनी कोर्टासमोर सांगितले.
जेनिफरच्या याचिकेवर सुनावणी सुरु असून शेन त्याच्या वडिलांसोबत कोर्टातच उपस्थित होता. शेन आता १२ वर्षांचा असून कोर्टात नेमका काय वाद सुरु आहे याबाबत तो गोंधळला होता. शेनच्या आईचे गेल्या वर्षीच निधन झाले होते.