बख्खळ कमाई करतात हे दोन कुत्रे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:56 AM2023-01-23T07:56:22+5:302023-01-23T07:57:20+5:30
ह्यूगो आणि हक्सले हे दोघे मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत.
ह्यूगो आणि हक्सले हे दोघे मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. ते यूट्यूबवर आहेत. टिकटॉकवर आहेत. इन्स्टाग्रामवर आहेत. ते मॉंक्लेअर, प्राडा आणि ॲन्या हाईन्डमार्च यांसारख्या लक्झरी ब्रॅंडस्साठी मॉडेल म्हणून काम करतात. ते जाहिराती करतात. ते फॅशन शोज करतात. ते मोठ्या हॉटेल्समध्ये राहतात आणि त्यांनी हे सगळे केल्यामुळे त्यांच्या मालकिणीला, उर्सुला एचसन हिला दरवर्षी १,००,००० पाउंड्स म्हणजेच साधारण एक कोटी रुपये उत्पन्न मिळते. मालकिणीला इतके पैसे कमावून देणारे ह्युगो आणि हक्सले कोण आहेत? तर ती आहेत गोल्डन रिट्रिव्हर जातीची कुत्री! आणि ती ज्या जाहिराती करतात त्यात माणसांसाठीची उत्पादनं तर असतातच; पण प्राण्यांसाठीची उत्पादनेसुद्धा असतात. त्यात प्रामुख्याने कॉलर्स, जॅकेट्स आणि हार्नेस या वस्तूंच्या जाहिरातींमध्ये त्यांना खूप मागणी आहे.
कोणी म्हणेल की, माणसांसाठीच्या जाहिरातींमध्ये कुत्रे वापरणं एक वेळ ठीक आहे. लोकांना एकूणच छान वागणाऱ्या कुत्र्यांबद्दल आणि एकूणच पाळीव प्राण्यांबद्दल फार प्रेम असतं. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी माणसांच्या जाहिरातीत कुत्रा दिसतो, पण पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांसाठी एवढे पैसे कोण देईल? किती झालं, तरी कुत्रे किंवा मांजर यांना लागून-लागून काय लागणार? फार-फार तर गळ्यातला पट्टा नाहीतर खाण्याचा वाडगा! पण तसं नाहीये. जगभरात एकूण जे प्राणी पाळले जातात त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. इतक्या मोठ्या बाजारपेठेचा हिस्सा असलेले ह्युगो आणि हक्सले हे मुळात या व्यवसायात आले कसे? हे काही सहज घडलं नाही. ती एक फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
मुळात उर्सुला एचसन ही विविध उत्पादनांसाठी फोटोग्राफी करायची. इतर लोकांच्या कुत्र्यांना एका जागी बसवून त्यांचे फोटो काढणं हा तिच्या कामाचा भाग होता. पण व्हायचं काय की, आलेले कुत्रे स्वभावाने चंचल असत. ते एका जागी बसायचे नाहीत. पटकन सांगितलेलं ऐकायचे नाहीत. अशा वेळी उर्सुला हक्सलेला तिथे घेऊन जायची. त्याच्या शांत वागण्यामुळे मॉडेल असलेला कुत्राही शांत व्हायचा. उर्सुलाच्या लक्षात आलं की, बऱ्याच वेळा मॉडेलपेक्षा हक्सले एका जागी जास्त वेळ बसू शकतो, तो जास्त आज्ञाधारक आहे. मग तिने त्याचेच फोटो काढून एजन्सीजकडे पाठवायला सुरुवात केली. त्याला कामही मिळायला लागलं. आता ह्युगो आणि हक्सले हे जगातले मोठे पेट इन्फ्लुएन्सर्स झाले आहेत. ते आता इतके बिझी असतात की, त्यांना शूटिंगसाठी घेऊन जाणं, त्यांची काळजी घेणं हेच उर्सुलाचं मुख्य काम झालेलं आहे.
पण ह्युगो आणि हक्सले हे काही जगातले पहिले पेट इन्फ्लुएन्सर्स नाहीत. पहिला पेट इन्फ्लुएन्सर पाळीव प्राणी हा मुळात कुत्रा नव्हताच, तर ती होती एक मांजर. तिचं खरं नाव टार्डर सॉस असलं तरी तिचं इंटरनेटवरचं नाव होतं, द ग्रंपी कॅट. तिच्या जबड्याच्या विशिष्ट ठेवणीमुळे ती कायमच वाईट मूडमध्ये असल्यासारखी दिसायची आणि त्यामुळेच तिचं हे नाव पडलं होतं; पण असं असलं तरी ती अतिशय प्रसिद्ध होती. तिच्यावर १००० हून जास्त मीम्स बनवली गेली आहेत. तिच्या नावाची पुस्तकं, तिच्यावर बेतलेली उत्पादनं; इतकंच नाही, तर तिची स्वतःची फिल्मसुद्धा आली होती. ही ग्रंपी कॅट इतकी प्रसिद्ध होती, ती २०१९ साली मेल्यानंतरदेखील तिच्या इन्स्टाग्राम पेजला २६ लाख फॉलोअर्स आहेत. तेव्हापासून पेट इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स कमी झालेले नाहीत.
आजच्या घडीचा अतिशय प्रसिद्ध पेट इन्फ्लुएन्सर म्हणजे टकर द गूफी गोल्डन रिट्रीव्हर. याचे इन्स्टाग्रामवर ३३ लाख फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर यंदाचं वर्ष हे चिनी समजुतीप्रमाणे सशांचं वर्ष आहे. त्यामुळे या वर्षी ससे आणि त्यासंबंधीच्या बाजारात एकूणच उलाढाल वाढलेली आहे. कुत्रा काय, मांजर काय आणि ससा काय… सहज बघताना जरी ‘साधे पाळीव प्राणी’ वाटत असले तरी त्यांची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे, यात शंका नाही.
पाळीव प्राणी वापरतात करोडोंच्या वस्तू
स्कायक्वेस्ट नावाच्या रिसर्च कंपनीच्या अभ्यासातून असं दिसून आलं, की ही जागतिक बाजारपेठ तब्बल ४.६ बिलियन पाउंड्स एवढी मोठी आहे. आता एक बिलियन म्हणजे किती? तर एकावर नऊ शून्य ! असे ४ बिलियन पाउंड्स इतकी वार्षिक उलाढाल पाळीव प्राण्यांच्या वस्तूंच्या विक्रीतून जगात होत असते. म्हणजे किती रुपये? - करा गणित...