मानवी अस्तित्वालाच ‘एआय’मुळे धोका?; यूनोच्या सुरक्षा परिषदेत १८ जुलैला विचारमंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2023 06:41 AM2023-07-05T06:41:15+5:302023-07-05T06:42:07+5:30
अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल.
संयुक्त राष्ट्र : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एएआय) नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील काळात जगावर नेमके काय परिणाम होणार अशी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. लोकांच्या मनात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एआयमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) सुरक्षा परिषदेत प्रथमच चर्चा होणार आहे. त्यासाठी १८ जुलैला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अण्वस्त्रांच्या नियंत्रणासाठी एआयचा होणारा संभाव्य वापर व त्यातील जोखीम इत्यादी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. (वृत्तसंस्था)
माणूस परावलंबी होईल
‘शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी एआयची आण्विक युद्धाच्या धोक्याशी तुलना केली आहे. एआयमुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी जगाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले असल्याचे अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले होते. एआयच्या वापरामुळे माणूस अधिक परावलंबी होईल.
माणसाची सर्जनशीलता नष्ट हाेईल?
माणसाचा मेंदू हा एक प्रकारचे जैविक यंत्रच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. यंत्राप्रमाणे माणसाच्या नैसर्गिक उत्क्रांतीलाही काही मर्यादा आहेत, असे म्हटले जाते. एआयचा वापर करून स्वयंविकास साधण्याचे प्रशिक्षण मिळालेली यंत्रे मानवजातीस कायमचे नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवतील, असे शास्त्रज्ञांना वाटते. एआयमुळे माणसाची विचारशक्ती संपण्याचा तसेच त्याची सर्जनशीलता संपुष्टात येण्याची ही शक्यता वर्तविली जाते. एआयचा भविष्यात पगडा वाढल्यास विविध शस्त्रांचा अनिर्बंध वापर वाढण्याचीही भीती आहे.एआयशी संबंधित अशा अनेक मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे.