Facebook : फेसबुकच्या ट्रेड टूलद्वारे जगभर होतेय मानवी तस्करी; माजी कर्मचारी फ्रान्सिस होगेन यांच्या आरोपामुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:33 AM2021-10-28T05:33:38+5:302021-10-28T05:33:58+5:30
Facebook : होगेननी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या.
वॉशिंग्टन : फेसबुकच्या ट्रेड टूलमार्फत जगभरात मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होते, असा आरोप कंपनीची माजी कर्मचारी फ्रान्सिस होगेन यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ट्रेड टुलमध्ये महिलांचे वय, फोटो अशी माहिती दिली जाते. त्यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ माजली आहे.
होगेननी अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनसमोर दिलेल्या साक्षीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या. त्यांनी सांगितले की, जर फेसबुकवर कोणीही अरबी भाषेत खादीमा किंवा मेड्स असा शब्द लिहून शोध घेतला तर आफ्रिकी तसेच दक्षिण आशियाई महिलांची छायाचित्रे आदी तपशील किमतीसकट दिसून येईल. ती छायाचित्रे पाहून या महिलांची कोणीही निवड करू शकतो व दिलेल्या किमतीइतके पैसे मोजून आपल्याकडे बोलावून घेऊ शकतात. ही उघडपणे चाललेली मानवी तस्करी आहे.
होगेन यांनी उघड केलेल्या कागदपत्रांमधून भारताबद्दलच्या काही गोष्टी उजेडात आल्या. भारतामध्ये २०१९ साली लोकसभा निवडणुकांवर फेसबुकने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही या कंपनीच्या अंतर्गत अहवालाच्या नोंदींच्या आधारे करण्यात आला होता. या प्रकरणी फेसबुकची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली होती. (वृत्तसंस्था)
आखाती देशांत कामगारांचे शोषण
फेसबुकने म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये विदेशी कामगारांचे शोषण होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. फेसबुकचा वापर करून मानवी तस्करी करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. हे प्रकार कसे रोखता येतील, यावर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत.
तक्रारीनंतरही कारवाई नाही
दोन वर्षांपूर्वी आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक व इन्स्टाग्राम हटविण्याचा इशारा ॲपलने दिला होता, त्यामागे मानवी तस्करी हेच महत्त्वाचे कारण होते.
फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये मानवी तस्करी होत आहे. विदेशी महिलांची कामांच्या नावाखाली त्यांची पिळवणूक होते, असा आरोप ॲपलने केला होता.
महिलांची पिळवणूक करणाऱ्यांना दोन ॲपमधून हटविले जाईल, असे आश्वासन फेसबुक दिले. पण ते पाळले नाही.