रशियाच्या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सप्टेंबरमध्येच होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:50 AM2020-09-06T01:50:50+5:302020-09-06T01:51:04+5:30
लॅन्सेट या नियतकालिकाने म्हटल्याने या लसीच्या गुणवत्तेवरील मळभही काही प्रमाणात दूर झाले आहे.
मॉस्को : रशियाने बनविलेल्या स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांना या महिन्यापासून भारतात प्रारंभ होणार आहे. भारतामध्ये याचे ३० कोटी डोस बनविण्याची रशियाची योजना आहे. ही लस सुरक्षित असल्याचे पहिल्या व दुसऱ्या चाचणीत दिसून आल्याचे लॅन्सेट या नियतकालिकाने म्हटल्याने या लसीच्या गुणवत्तेवरील मळभही काही प्रमाणात दूर झाले आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल द्रिमित्रीव यांनी सांगितले की, जगभरातील ६० टक्के लसींचे उत्पादन एकट्या भारतामध्ये होते. त्यामुळे लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची भारतामध्ये क्षमता आहे हे रशियाला ठाऊक आहे.रशियाने स्पुटनिक व्ही ही लस विकसित केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या बैठकीसाठी मॉस्कोला गेलेले राजनाथसिंह व अन्य देशाच्या संरक्षणमंत्र्यांना याचा नमुना देण्यात आला.