शार्कपेक्षा माणूस ३०० पट जास्त धोकादायक; अन्न, औषध आणि व्यवसायासाठी मुक्या प्राण्यांचे शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:09 AM2023-07-05T10:09:51+5:302023-07-05T10:32:05+5:30
नवे संशोधन; अन्न, औषध आणि व्यवसायासाठी मुक्या प्राण्यांचे शोषण
लंडन : प्राण्यांपेक्षा माणूस जास्त धोकादायक आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. मानव खरोखरच धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांनी संशोधनातून प्रथमच सिद्ध केले आहे. ब्रिटनमधील वॉलिंगफोर्ड ऑक्सफर्डशायरच्या सेंटर फॉर इकॉलॉजी अँड हायड्रोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की, शार्कसारख्या शिकारी प्राण्यांपेक्षा मानव ३०० पट जास्त धोकादायक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मानव कधी-कधी एक तृतीयांश प्राण्यांचे अन्न म्हणून, कधी औषध म्हणून, तर कधी पाळीव प्राणी म्हणून शोषण करतो; यामुळे जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याचा धोका वाढला आहे.
निसर्ग आणि पर्यावरणाला मोठा धोका...
मानवाची ही प्रवृत्ती त्यांना पांढऱ्या शार्कसारख्या भक्षकांपेक्षा शेकडो पटींनी जास्त धोकादायक बनवते. मानवाची ही प्रवृत्ती निसर्गासाठी तसेच पर्यावरणासाठी एक गंभीर इशारा आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. संशोधनाशी संबंधित डॉ. रॉब कुक म्हणाले की, संशोधनात जे आढळले ते अतिशय आश्चर्यकारक आहे. प्राण्यांना वापरण्यासाठी मानवाकडे अनेक युक्त्या आहेत. जगभर मानव-निसर्ग संबंध अधिक दृढ करण्याची गरज आहे.
प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर
संशोधकांना असे आढळले की, प्राण्यांच्या १४,६६३ प्रजातींचा वापर किंवा व्यापार केला जातो. यातील ३९ टक्के प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. संशोधनादरम्यान, ५०,००० विविध वन्य, सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि मासे यांचा अभ्यास करण्यात आला.