CoronaVirus अमेरिकेत पन्नाशीच्या आतील शेकडो व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:58 AM2020-04-10T05:58:19+5:302020-04-10T05:58:30+5:30
मृतांमधील किमान ७५९ या वयोगटातील : तिशीतील मृतांचे प्रमाणही लक्षणीय
वॉशिंग्टन : ज्यांचे वय साठीच्या पुढे आहे व ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा दमा यांसारखे जुनाट आजार आधीपासूनच आहेत, अशा व्यक्तींना कोरोना अधिक धोकादायक ठरतो, असे मानले जात असले तरी, अमेरिकेत जुनाट आजार नसलेल्या पन्नाशीच्या आतील शेकडो व्यक्तीही या महामारीला बळी पडल्याचे दिसून येत आहे.
‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अग्रगण्य दैनिकाने अमेरिकेत बुधवारपर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता मृतांमधील किमान ७५९ व्यक्ती पन्नाशीच्या आतील होत्या व त्यांना वर उल्लेखिलेले आजारही आधीपासून नव्हते, असे निष्पन्न झाले. यावरून या महाभयंकर साथीची लागण झाल्यास मृत्यू कोणाला टळेल व कोणाला नाही याची खात्री देता येत नाही, हे स्पष्ट होते.
वयाची विशीही न गाठलेल्या किमान नऊ जणांचाही या रोगाने बळी घेतला हेही लक्षणीय आहे. वयाचे एकेक दशक जसे पुढे जाते तसा मृत्यूचा धोकाही अधिक असल्याचेही या विश्लेषणावरून दिसते. आकडेवारीवरून असे दिसते की, मृतांपैकी ४५ व्यक्ती विशीतील, १९० तिशीतील तर ४१३ चाळिशीतील होत्या. विविध राज्यांनी मृतांची वयोगटानुसार वर्गवारी निरनिराळ््या पद्धतीने केलेली असल्याने नेमका निष्कर्ष काढणे कठीण असले तरी मृत्यू झालेले आणखी किमान १०२ पन्नाशीच्या आतील होते, असेही दिसते.
सर्वच राज्ये वयोगटानुसार मृतांच्या आकडेवारीचे संकलन करीत नसल्याने व त्यात साथीचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांचाही समावेश असल्याने पन्नाशीच्या आतील मृतांचा आकडा याहूनही जास्त असण्याची शक्यता आहे.
वयाची पन्नाशीही न गाठलेल्या पण कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या या साथीचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या न्यूयॉर्क राज्यात व शहरात सर्वात जास्त असल्याचेही ही आकडेवारी दाखविते. तेथे विशीही न गाठलेल्या सहा, विशी ओलांडलेल्या ३३, तिशीमधील ११८, चाळिशीतील २६५ व्यक्ती कोरोनातून वाचू शकलेल्या नाहीत. (वृत्तसंस्था)
भारतीय वंशाचे ११ नागरिक संसर्गाने दगावले
४अमेरिकेत कोरोनाच्या साथीने आत्तापर्यंत मरण पावलेल्या १४ हजारांहून अधिक लोकांमध्ये मूळ भारतीय वंशाच्या ११ व्यक्तींचा समावेश आहे. याखेरीज या आजाराची लागण झालेले आणखी किमान १६ भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सध्या ‘सेल्फ क्वारंटाइन’मध्ये आहेत.
४ मृत्यू झालेले हे सर्व भारतीय वंशाचे नागरिक पुरुष आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू न्यूयॉर्क व न्यूजर्सी या राज्यांमध्ये झाला आहे. फ्लोरिडा राज्यात एकाचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये मरण पावलेल्यांमध्ये चौघे टॅक्सी ड्रायव्हर होते, असेही समजते. कॅलिफोर्निया व टेक्सास या राज्यांमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांमध्येही काही भारतीय वंशाच्या व्यक्ती असण्याची शक्यता आहे. पण त्यांचे राष्ट्रीयत्व अद्याप नक्की कळालेले नाही.
४कडक निर्बंधांमुळे यापैकी अनेक मृतांवर स्थानिक प्रशासनानेच अंत्यसंस्कार केले व मृतांच्या कुटुंबीयांनाही त्या वेळी हजर राहू दिले गेले नाही, असेही सांगितले जाते.
४बाधित झालेल्या भारतीय वंशाच्या १६ व्यक्ती मूळच्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व कर्नाटक या भारतातील राज्यांतील आहेत. अमेरिकेतील भारतीय वकिलात व विविध शहरांमधील वाणिज्य दूतावास भारतीय अमेरिकी संघटनांच्या सहकार्याने कोरोनावाधित भारतीय वंशाचे नागरिक व विद्यार्थी यांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.