या देशाच्या पंतप्रधानांनी घातली बेघर लोकांना रस्त्यावर झोपण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 05:08 PM2018-10-15T17:08:29+5:302018-10-15T17:16:43+5:30
गरिबीमुळे घर घेणे परवडत नसल्याने अजूनही लाखो लोकांना रस्त्यावर राहावे लागते.
बुडापेस्ट - गरिबीमुळे घर घेणे परवडत नसल्याने अजूनही लाखो लोकांना रस्त्यावर राहावे लागते. भारताप्रमाणेच पाश्चिमात्य देशातही गरिबीमुळे रस्त्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, अशा लोकांमुळे इतर नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी युरोपमधील हंगेरी या देशाच्या पंतप्रधानांनी रत्यावर झोपण्यास बंदी लागू केली आहे. पण पंतप्रधानांचा हा निर्णय क्रूर असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओर्बन यांनी हा निर्णय लागू केला आहे. हंगेरीच्या सरकारने 20 जून रोजी संविधानात दुरुस्ती करून सार्वजनिक ठिकाणी नेहमी वास्तव्य करण्यावर बंदी घातली होती. त्याआधी 2013 साली सार्वजनिक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली होती.
हंगेरीमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आता पोलिसांकडे रस्त्यावर झोपणाऱ्यांना तेथून हटवण्याचे तसेच त्यांच्या झोपड्या तोडण्याचे संपूर्ण अधिकार असतील. हा कायदा समाजाच्या हितांची काळजी घेणारा आहे, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बेघर माणसांनी रात्रीच्या वेळी रस्ते अडवू नयेत, तसेच त्यांच्यामुळे सर्वसामान्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रस्त्यांचा वार करता येईल, या होतूने हा निर्णय लागू करण्यात आल्याचे हंगेरीच्या समाजकल्याण मंत्री अतिला फुलोप यांनी सांगितले.
हंगेरीमध्ये सरकारी निवारा केंद्रे असून, तेथे 11 हजार जणांच्या राहण्याची सोय आहे. मात्र सध्या सुमारे 20 हजार लोक रस्त्यांवर वास्तव्य करत आहेत. देशातील बेघर नागरिकांना देण्यात येत असलेल्या अनुदानांमध्ये वाढ करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संघटनांकडून हंगेरी सरकारच्या या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.