चिंताजनक अन् दुर्दैवी! व्हेल माशाचा मृत्यू; पोटात सापडलं तब्बल 40 किलो प्लास्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:48 AM2019-03-19T11:48:42+5:302019-03-19T11:50:14+5:30
प्लास्टिक प्रदूषणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे
मनीला: फिलिपिन्समध्ये एका व्हेल माशाचा भूकेनं मृत्यू झाला आहे. या माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लास्टिक मिळालं आहे. या कचऱ्यामुळे व्हेल मासा काहीच खाऊ शकला नसावा, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. पोटात प्लास्टिक गेल्यानं मासा आजारी होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. प्लास्टिक पोटात गेल्यानं माशाचा मृत्यू झाल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. मात्र ही घटना सर्वात गंभीर असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
फिलिपिन्सच्या दक्षिण भागातील कम्पोस्टेलामध्ये 4.7 मीटर लांबीच्या व्हेल माशाचा मृत्यू झाला. यानंतर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटना आणि प्रशासनाकडून शवविच्छेदन करण्यात आलं. यात माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लास्टिक आढळून आलं. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, अन्नधान्यांच्या पोत्यांचा समावेश होता. 'प्लास्टिक कचरा खाल्ल्यानं व्हेल माशाला गॅसचा त्रास झाला. त्यामुळे माशाला आणखी काहीच खाता आलं नाही आणि त्याचा भूकबळी गेला. हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे,' असं डी बोन कलक्टर म्युझियमचे संचालक डॉरेल ब्लेचले यांनी सांगितलं.
आम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये 62 डॉल्फिन आणि काही व्हेल माशांचं शवविच्छेदन केलं आहे. मात्र याआधी कधीच कोणत्याही माशाच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडलं नाही, अशी माहिती ब्लेचले यांनी दिली. व्हेल मासा अतिशय कमजोर झाला होता. त्याला पोहण्यातही अडचणी येत होत्या, असं मत्स विभागाच्या संचालिका फातिमा इद्रिस यांनी सांगितलं. फिलिपिन्समध्ये प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे. फिलिपिन्समध्ये पुनर्प्रक्रिया होणाऱ्या प्लास्टिकचा फारसा वापर केला जात नाही. केवळ एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्यानं पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटनांनी फिलिपिन्सचा समावेश महासागर प्रदूषित करणाऱ्या देशांमध्ये केला आहे.