अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:05 PM2024-06-11T22:05:45+5:302024-06-11T22:09:26+5:30
हंटर बायडेन याच्या विरोधात ड्रग्जचे सेवन करताना बंदूक बाळगल्यासह तीन प्रकरणांचा खटला सुरू होता.दरम्यान, आता कोर्टाने निकाल दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन फेडरल गन प्रकरणात दोषी आढळला आहे. डेलावेअर न्यायालयाने हंटरला ड्रग्जशी संबंधित दोन अन्य प्रकरणांमध्येही दोषी ठरवले आहे. ड्रग्जच्या प्रभावाखाली असताना हंटरला विरोधात बंदुक बाळगल्याचे तीन गुन्हे होते. त्याने ज्युरीसमोर स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले होते. अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्रपतींच्या मुलाचा समावेश असलेले हे पहिले प्रकरण आहे. अमेरिकेतील निवडणुकी दरम्यान हंटर बायडेनला दोषी ठरवल्याने जो बायडेन यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
बायडेन दोषी आढळलेल्या तीन प्रकरणांपैकी दोन प्रकरणांमध्ये १० वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा आहे, तर तिसऱ्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा आहे. फेडरल शिक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या शिफारशींनुसार, शिक्षा कमी करणे किंवा वाढवणे हे न्यायाधीशांवर अवलंबून आहे. प्रत्येक प्रकरणात अंदाजे २ लाख ५० हजार डॉलर्सच्या दंडाचीही तरतूद आहे. मात्र, हंटर याला शिक्षा केव्हा ठोठावण्यात येईल, याचा निर्णय झालेला नाही.
ज्या तीन प्रकरणांमध्ये जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी आढळला आहे, त्यामध्ये शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आहे, पण त्यांनी ६ जून रोजी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत असे जाहीर केले होते. जेव्हा खटला सुरू झाला तेव्हा बायडेन म्हणाले होते की, ते आपल्या मुलावर प्रेम करतात आणि त्याचा अभिमान आहे. खटल्यांच्या सुनावणीवेळी जो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन कोर्टात हजर होत्या.
ज्या दोन प्रकरणांमध्ये हंटर बायडेनला दोषी ठरवण्यात आले आहे, त्यापैकी एका प्रकरणात त्याच्यावर खोटी माहिती फॉर्ममध्ये दिल्याचा आणि कोल्ट कोब्रा रिव्हॉल्व्हर खरेदी केल्याचा आरोप होता. त्याच्याविरुद्धचा तिसरा गुन्हा म्हणजे तो ड्रग्ज सेवन करत असताना त्याच्याकडे बंदूक होती.अमेरिकेत कोणतीही बंदूक खरेदी करताना, खरेदीदाराला एक अनिवार्य प्रश्न विचारला जातो की तो ड्रग व्यसनी आहे की नाही. या प्रश्नाला हंटरने चुकीचे उत्तर दिले होते.