हायड्रोजन बॉम्बचे जगभरात हादरे!

By Admin | Published: January 7, 2016 02:49 AM2016-01-07T02:49:45+5:302016-01-07T02:49:45+5:30

जगाला संहारक सावटाखाली ढकलण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत, बुधवारी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा परिणाम म्हणून मोठा धरणीकंप झाला

Hydrogen bomb worldwide! | हायड्रोजन बॉम्बचे जगभरात हादरे!

हायड्रोजन बॉम्बचे जगभरात हादरे!

googlenewsNext

सेउल : जगाला संहारक सावटाखाली ढकलण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत, बुधवारी उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. या चाचणीचा परिणाम म्हणून मोठा धरणीकंप झाला, पण त्याहीपेक्षा मोठा हादरा अखिल मानवजातीच्या सुरक्षेचा पुरस्कार करणाऱ्यांना बसला. या चाचणीने उभे जग हादरले असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अमेरिका आणि अन्य शत्रूंपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी मिळविलेले आणखी एक हत्यार या दृष्टीने उत्तर कोरिया या चाचणीकडे पाहात आहे, पण त्यांचा सख्खा शेजारी द. कोरिया आणि संयुक्त राष्ट्रांनाही यात भविष्यातील विनाशाची चाहुल जाणवत आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तत्काळ आपत्कालीन बैठक बोलविली आहे. आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणाऱ्या उ. कोरियावरील निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे.
कोणालाही विश्वासात न घेता, अचानक केलेल्या या चाचण्यांमुळे उ. कोरियाचे शेजारी चीन, दक्षिण कोरिया आणि जपानने निषेध व्यक्त केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना भेटून सात दशके अडकून पडलेल्या बेटांबाबत करार केला होता. त्याचे स्वागत जगभरात होत असताना, या चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांततेस तडा गेल्याचे मत व्यक्त होत आहे. ही चाचणी शांततेला धोकाच असल्याचे मत जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी व्यक्त केले आहे. उत्तर कोरियाच्या या असल्या कारवाया जपान खपवून घेणार नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये माध्यमांशी बोलताना अबे यांनी सांगितले.
उत्तर कोरियाचा सख्खा शेजारी आणि तितकाच सनातन वैरी देश दक्षिण कोरियाने या चाचणीवर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष पार्क ग्येउन हे यांनी उ. कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे समजताच राष्ट्रिय सुरक्षा समितीची तात्काळ बैठक बोलावली. ही चाचणी केवळ आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका नसून आमच्या भविष्यावरही यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे पार्क म्हणाले. चीनने या चाचण्यांना विरोध केला आहे. तसेच शांततेचा भंग होईल असे काहीही उत्तर कोरियाने करु नये असे मत व्यक्त केले. अमेरिका, इंग्लंडनेही या चाचण्यांचे वर्णन इतर देशांना दिलेली चिथावणी असे करुन त़्याचा निषेध केला.
1अणुबॉम्बमध्ये फिशन (कण एकमेकांपासून दूर जाणे) प्रक्रियेचा वापर केला जातो, तर फ्युजन (कण जवळ येणे) प्रक्रियेचा वापर हायड्रोजन बॉम्बमध्ये होतो.
2हायड्रोजन बॉम्बमध्ये एका भागात इंधन असते, तर दुसरा भाग ट्रिगरप्रमाणे काम करतो.
3हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा कित्येक पटीने शक्तिशाली असू शकतात.
4हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटात न्यूक्लीयर फ्युजनमुळे ४०० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढू शकते आणि धरणी कंप पावते. उ. कोरियाने घेतलेल्या चाचणीत ५.१ रिश्टर स्केलचे धक्के नोंदविण्यात आले.
5या चाचणीत हायड्रोजन बॉम्बचा वापर झाला
की नाही हे अजून निश्चित नाही, पण उ. कोरियाने बूस्टेड बॉम्बचा वापर केला असावा, असे काही तज्ज्ञ मत मांडत आहेत.
बांबूच्या पडद्याआडच्या हालचाली : उत्तर कोरियामध्ये चालू असलेल्या गुप्त आणि तितक्याच संशयास्पद हालचालींमुळे, या देशातील वास्तव माहिती कधीही नीट समजत नाही. पित्याच्या निधनानंतर सत्तेत आलेल्या किम जोंग उन सत्तेमध्ये आल्यावर, त्यांच्या वयावरून पाश्चात्य देशात खिल्लीही उडवली गेली. मात्र, वडिलांप्रमाणे किम जोंग उननेही आपली सत्तेवर व देशावर पकड असल्याचे अल्पावधीत दाखवून दिले.
वर्षारंभ थरारक आवाजाने करू या... दिले होते संकेत
हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन सर्व जगाला हादरवण्याचे संकेत किम जोंग उनने तीन आठवड्यांपूर्वीच दिले होते. २०१६ ची सुरुवात हायड्रोजनच्या थरारक आवाजाने करू या म्हणजे जगाचे आपल्या समाजवादी, प्रजासत्ताक, अणुशक्तीने सज्ज अशा देशाकडे आणि कोरियाच्या वर्कर्स पार्टीकडे लक्ष जाईल, अशा शब्दांमध्ये 'संदेश' दिला आहे.
2002
मध्ये उ. कोरियाने गुप्तपणे अणुकार्यक्रम चालू असल्याची कबुली दिली. त्यानंतर आॅक्टोबर २००६मध्ये प्युंगे रि येथे अणुचाचणी करून जगाला धक्का दिला. २००९मध्ये त्यांनी आणखी चाचण्या यशस्वी करून दाखविल्या.
2012
मध्ये उ. कोरियाने रॉकेटचीही चाचणी घेतली होती, त्यानंतर २०१३ साली अणुचाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे उ. कोरियाबद्दल दक्षिण कोरियाने नेहमीच भीती व्यक्त केली आहे.
उत्तर कोरियाबद्दल
दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करल्यानंतर त्यांची कोरियन वसाहत संपुष्टात आली. १९४८साली कोरियाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग झाले. उत्तर कोरिया रशियाच्या कंपूत तर दक्षिण अमेरिकेच्या कंपूत गेला. १९५० ते १९५३ कोरिया युद्ध झाले.

Web Title: Hydrogen bomb worldwide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.