"हायपरलूप" भुयारी प्रकल्पामुळे न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन प्रवास फक्त 29 मिनिटांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 08:24 AM2017-07-21T08:24:13+5:302017-07-21T09:50:54+5:30
प्रसिद्ध तंत्रज्ञ एलोन मस्क यांनी गुरुवारी हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारीत भुयारी वाहतूक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे टि्वटरवरुन जाहीर केले.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 21 - प्रसिद्ध तंत्रज्ञ एलोन मस्क यांनी गुरुवारी हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारीत भुयारी वाहतूक प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे टि्वटरवरुन जाहीर केले. हा प्रकल्प आकाराला आला तर, न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन या दोन शहरांमधील अंतर फक्त 29 मिनिटात पार करता येईल. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन या अमेरिकेच्या दोन शहरांमध्ये अल्ट्रा-हाय-स्पीड अंडरग्राउंड ट्रान्सपोर्ट सिस्टमचे बांधकाम सुरू करण्यासाठी सरकारकडून तोंडी मंजूरी मिळाल्याचे एलोन मस्क यांनी सांगितले.
एलोन मस्क हे इलेक्ट्रिक कार मेकर टेस्ला आणि रॉकेट कंपनी स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मेट्रो आणि मोनो रेल प्रमाणे हायपरलूप तंत्रज्ञान भविष्यातील वाहतुकीचे प्रभावी साधन बनू शकते. मस्क यांनी तोंडी मंजूरी मिळाल्याचे जाहीर केले असले तरी, अशा कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे वॉशिंग्टन व न्यूयॉर्कमधील अधिका-यांनी सांगितले.
आणखी वाचा
फेडरल नियमानुसार एलोन मस्क यांना हायपरलूप सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी पर्यावरणविषयक आणि अन्य परवानग्या घ्यावा लागतील. हायपर लूप ट्रान्सपोर्टमध्ये निर्वात भुयारी पोकळीतून पॉड किंवा टयुबमधून प्रवासी आणि मालवाहतूकीची योजना आहे. हा प्रकल्प आकाराला आला तर जगातील सर्वात मोठा भुयारी मार्ग असेल.
एलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी हा भुयारी वाहतूक प्रकल्प उभारण्यासाठी बोरिंग नावची कंपनी स्थापन केली. सध्याच्या हाय स्पीड ट्रेनपेक्षा हायपरलूप वाहतूक अधिक वेगवान असेल असे एलोन मस्क यांनी सांगितले. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनच्या अधिका-यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याचे सांगितल्यानंतर मस्क यांनी अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी अजून बरेच काही करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हा प्रकल्प अधिक वेगाने व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला याची माहिती द्या असे आवाहन मस्क यांनी केले आहे.
एलोन मस्क यांनी सर्वप्रथम 2012 मध्ये त्यांची हायपरलूप ट्रान्सपोटेशनची कल्पना जाहीर केली होती. 2013 मध्ये मस्क यांनी लॉस एंजल्स ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 640 किलोमीटरचे हायपरलूप नेटवर्क उभारण्यासाठी 6 अब्ज डॉलरपेक्षा कमी खर्च येईल तसेच हा मार्ग उभारणीसाठी सात ते दहावर्ष लागतील असे सांगितले होते. मार्च महिन्यात मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या नव्या प्रकारच्या ट्रान्सपोटेशनचे अमेरिकत समर्थक आणि विरोधक दोन्ही आहेत.
Just received verbal govt approval for The Boring Company to build an underground NY-Phil-Balt-DC Hyperloop. NY-DC in 29 mins.
— Elon Musk (@elonmusk) July 20, 2017
Still a lot of work needed to receive formal approval, but am optimistic that will occur rapidly
— Elon Musk (@elonmusk) July 20, 2017