ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितलं फ्रान्सचं नागरिकत्व; सांगितलं 'हे' कारण
By जयदीप दाभोळकर | Published: January 1, 2021 12:40 PM2021-01-01T12:40:17+5:302021-01-01T12:42:15+5:30
Boris Johnson : बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं म्हटलं. तसंच यामागे कोणतं कारण आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली.
ब्रिटननं काही महिन्यांपूर्वी युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता ब्रक्झिटची ही प्रक्रिया जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अशातच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी फ्रान्सचं नागरिकत्व मागितल्याची माहिती समोर आली. बोरिस जॉन्सन यांचे वडिल स्टॅनले जॉन्सन यांनी गुरूवारी या वृत्ताला दुजोरा दिला.
स्टॅनले जॉन्सन यांनी आरटीएल रेडियोशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी आपल्याला फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचं वक्तव्य केलं. "जर खरं सांगायचं झालं तर मी फ्रान्सचाच आहे. माझ्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्यांची आईदेखील फ्रान्सची होती आणि त्यांचे वडिलदेखील फ्रान्सचेच नागरिक होते," असं स्टॅनले जॉन्सन आरटीएल रेडियोशी बोलताना म्हणाले. "माझ्या समोर हा प्रश्न आहे की माझ्याकडे पहिल्यापासून काय आहे आणि मी याबाबत अतिशय खुश आहे," असंही ते म्हणाले.
"मी कायमच युरोपियन राहणार आहे. युरोप एका मार्केटपेक्षाही मोठं आहे. ते युरोपियन महासंघापेक्षाही मोठं आहे. युरोपियन महासंघासोबत एकत्रित असणं महत्त्वपूर्ण आहे," असंही स्टॅनले म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी युरोपियन महासंघाच्या पासपोर्टचाही उल्लेख केला. यापूर्वी स्टॅनले जॉन्सन यांची कन्या आणि बोरिस जॉन्सन यांची बहिण रशेल यांनी मार्च महिन्यात एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांना फ्रान्सचं नागरिकत्व हवं असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसंच त्यांना फ्रान्सचं नागरिकत्व मिळालं तर आपणदेखील फ्रेन्च बनू इच्छितो असंही त्या म्हणाल्या होत्या.