आम्ही इस्रायलच्या सोबत दहशतवादाच्या विरोधात ठाम उभे आहोत - PM ऋषी सुनक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:44 PM2023-10-19T15:44:24+5:302023-10-19T15:45:20+5:30
इस्रायलला पोहोचल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली
Rishi Sunak supports Israel : इस्रायलने गाझावर जाहीर केलेल्या 'संपूर्ण घेराबंदी'मध्ये शिथिलता येण्याची शक्यता आहे. तेल अवीवने इस्रायलकडून रफाह सीमेवरून गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी मर्यादित मदतीला परवानगी दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धग्रस्त प्रदेशात पाणी, अन्न आणि इतर पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी तेल अवीवमध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. या दरम्यान, या युद्धात अमेरिकेसोबतच आता इंग्लंडदेखील इस्रायलच्या पाठीशी असल्याचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले.
आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलला पोहोचले. त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांची भेट घेऊन युद्ध परिस्थितीवर चर्चा केली. इस्रायलला पोहोचल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. बैठकीनंतर ऋषी सुनक यांचे एक वक्तव्य आले. ते म्हणाले की, ते पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी आहेत. ऋषी सुनक यांनी ट्विटरवर लिहिले की, मी इस्रायलमध्ये आहे, हा देश सध्या शोकाकूल आहे, मी देखील तुमच्या दुःखात सहभागी आहे आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आज आणि कायम तुमच्यासोबत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले की, त्यांचा देश इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. इतकेच नव्हे तर हॉस्पिटलवरील हल्ल्यामागे इस्रायलचा हात नसून अन्य कोणाचा तरी हात असल्याचेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नमूद केले. युनायटेड स्टेट्सने औपचारिकपणे दावा केला की त्यांच्या गुप्तचर मूल्यांकनातून असे दिसून आले आहे की गाझा रुग्णालयावरील हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार नाही, ज्यात सुमारे 500 लोक मारले गेले. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी जमिनीवरील हल्ल्याबाबत कोणतीही ताजी टिप्पणी केली नसली तरी गाझावरील जमिनीवरील हल्ल्यासाठी अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या 4000 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.