मी सक्तीच्या विजनवासात रहातोय - विजय मल्ल्या
By admin | Published: April 29, 2016 10:47 AM2016-04-29T10:47:09+5:302016-04-29T10:47:09+5:30
माझा पासपोर्ट रद्द करुन किंवा मला अटक करुन बँकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत असे विजय मल्ल्याने यूकेमध्ये फायनान्शिअल्स टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २९ - यूके सोडून भारतात परतण्याचा माझा कोणताही विचार नाही. मला सक्तीने विजनवासात रहावे लागत आहे. माझा पासपोर्ट रद्द करुन किंवा मला अटक करुन बँकांना त्यांचे पैसे परत मिळणार नाहीत असे विजय मल्ल्याने यूकेमध्ये फायनान्शिअल्स टाईम्स या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप असलेल्या विजय मल्ल्याचा पासपोर्ट भारत सरकारने रद्द केला असून, त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. यूकेमध्ये असलेल्या विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने यूके सरकारला पत्र लिहीले आहे.
माझ्या नेत्रदीपक बिझनेस करीयरमध्ये कर्ज बुडवण्यावरुन जे आरोप सुरु आहेत तो वेदनादायी अध्याय मला संपवायचा आहे असे मल्ल्याने फायनान्शिअल टाईम्सला सांगितले. कर्ज घेतल्यानंतर नेहमीच मी बँकांबरोबर चर्चा केली आहे. मला बँकांची देणी फेडायची आहेत. पण आकडा दोन्ही बाजूंना मान्य असला पाहिजे. मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्स चालवण्यासाठी बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
माझा पासपोर्ट जप्त करुन किंवा मला अटक करुन बँकांना त्यांचा पैसा मिळणार नाही. भारतात सध्या माझ्या विरोधात जे वातावरण तापले आहे त्यामुळे बँका माझा प्रस्ताव स्वीकारायला तयार नाहीत. यात प्रसारमाध्यमं जनमत तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत अस सांगताना मल्ल्याने मिडीयावर पुन्हा टीका केली.