मरणाला, पुतीन यांना मी भीत नाही; धाडसी युलियाचं आयुष्य बदललं, त्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:18 AM2023-02-23T10:18:27+5:302023-02-23T10:18:54+5:30

युक्रेनमध्ये असंही सैनिकांची कमतरता होती. कोणालाच युद्धाचा, प्रत्यक्ष लढण्याचा फारसा अनुभव नव्हता. तरीही अनेकांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपली नावं सरकारकडे नोंदवली आणि सांगितलं,

I am not afraid of death, Putin; Brave yulia bondarenko's life changed, his story! | मरणाला, पुतीन यांना मी भीत नाही; धाडसी युलियाचं आयुष्य बदललं, त्याची गोष्ट!

मरणाला, पुतीन यांना मी भीत नाही; धाडसी युलियाचं आयुष्य बदललं, त्याची गोष्ट!

googlenewsNext

युलिया आणि तिच्या सहकाऱ्यांनी एका शॉपिंग मॉलमध्ये आसरा घेतला होता आणि तिथून ते लढत होते. भयानक थंडी होती, पुरेसे कपडे नव्हते, तरीही युलियानं कसलाही बाऊ नाही. थोड्याच दिवसांत त्यांनी कीव्हमधून रशियन सैन्याला माघार घ्यायला लावली. यानंतर युलियासारख्या महिलांना पर्याय देण्यात आला, आता तुम्ही युद्धभूमी सोडू शकता. हवं तर तुम्ही घरी जाऊ शकता किंवा लष्करात प्रशासकीय काम अथवा ‘कूक’ म्हणून सेवा देऊ शकता.. पण जिद्दी युलियानं सांगितलं, मी रणभूमी सोडणार नाही. मरणाला आणि रशियाला मी भीत नाही. सांगा पुतीन यांना, आम्ही सच्चे सैनिक आहोत. बचेंगे, तो और भी लडेंगे..

युलिया बोंदारेंको. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील एका शाळेत शिकवणारी ही तरुण, अविवाहित शिक्षिका. तिचं आयुष्य अगदी मजेत चाललं होतं. रोज शाळेत जाणं, मुलांना शिकवणं, त्यांच्यात रममाण होणं.. शाळेतल्या मुलांबरोबरचं हे आयुष्य युलिया अतिशय मनापासून एन्जॉय करीत होती. आणि अचानक ती घटना घडली.. रशियानं अचानक युक्रेनवर हवाई हल्ले करायला, त्यांच्यावर क्षेपणास्त्रं डागायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकं घाबरली. सगळीकडे पळापळ झाली. जागा मिळेल तिथे लोकांनी आपल्या बचावासाठी आश्रय घेतला. एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले.. हे हल्ले थांबायला तयार नव्हते. आपल्याला याच परिस्थितीत आता जगायला लागणार आहे आणि परिस्थितीशी, त्याचबरोबर रशियाशीही मुकाबला करावा लागणार आहे, हे लोकांच्या लक्षात आलं. आपापल्या लपलेल्या ठिकाणांहून त्यांनी बाहेर पडायला सुरुवात केली. 

युक्रेनमध्ये असंही सैनिकांची कमतरता होती. कोणालाच युद्धाचा, प्रत्यक्ष लढण्याचा फारसा अनुभव नव्हता. तरीही अनेकांनी सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने आपली नावं सरकारकडे नोंदवली आणि सांगितलं, आम्हाला नाही युद्धाचा अनुभव, आजवर आम्ही मुंगीही मारली नाही, पण आता आम्ही हाती शस्त्र धरायला तयार आहोत. रशियन सैन्याविरुद्ध आम्ही प्राणपणाने लढू. देशासाठी लढताना भले मग आमचा प्राण गेला तरी बेहत्तर.. एका अनामिक ध्येयानं, देशप्रेमानं भारलेल्या या युवकांमध्ये युलियाही होती. शाळेत लहान मुलांना शिकवणाऱ्या युलियानंही सैन्यात भरती होण्यासाठी किंवा युद्धकाळात पडेल ते काम करण्यासाठी आपलं नाव नाेंदवलं होतं. आपल्याला तर काहीच येत नाही, साधी गस्त घालायचाही अनुभव नाही, देशाला आपला काय उपयोग होईल, याबाबत युलियाला सुरुवातीला फार शंका होती. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी तिनं स्वयंसेवकांच्या यादीत आपलं नाव नोंदवलं आणि लगेच, त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील सर्वात मोठ्या युद्धातील एक सैनिक म्हणून नवी ओळख युलियाला मिळाली. 

युक्रेनियन ‘सैनिक’ म्हणून फिटनेस टेस्ट देण्यासाठी युलिया जेव्हा निघाली होती, तेव्हा ही फिटनेस चाचणी आपण पास होऊ की नाही, देशासाठी आपल्याला लढता येईल की नाही, याविषयी ती संदिग्ध होती, पण ही टेस्ट ती सहज ‘पास’ झाली. कारण ती फारशी अवघड नव्हतीच. युक्रेनला हवे होते देशासाठी लढणारे तरुण सैनिक! त्यामुळे अनेक तरुणांची लगेचंच सैनिक म्हणून निवड झाली. पहिल्याच दिवसापासून त्यांचं सैनिकी प्रशिक्षणही सुरू झालं. युक्रेनच्या ज्या सैनिकांनी आधी प्रत्यक्ष रणभूमीवर काम केलं होतं, जे सैनिक निवृत्त झाले होते, तेही परत युक्रेनच्या सैन्यात दाखल झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या साऱ्या युवकांना युद्धभूमीवर लढण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. युलियाच्याही हातात पहिल्याच दिवशी एक रायफल आणि १२० गोळ्या सोपवण्यात आल्या. ते पाहाताच युलिया अतिशय हरखली, इतर तरुण-तरुणींप्रमाणेच देशप्रेमाचं वारू तिच्याही अंगात संचारलं.. ज्या युक्रेनमध्ये सैनिकांची संख्या फक्त अडीच लाख होती, बघता बघता ती तब्बल दहा लाखांवर गेली, याचं कारण स्वत:हून लष्करात सामील झालेले युलियासारखे तरुण!

युद्धाच्या आधी युलियानं ना कधी गोळीबाराचा आवाज ऐकला होता, ना कधी कुठे बॉम्बस्फोट झाल्याचं पाहिलं होतं, पण हे आता तिच्या आयुष्यात रोजच घडायला लागलं. सैनिक कसा तयार होतो, युद्धात लढायचं कसं, जगायचं कसं आणि मारायचं कसं या सगळ्या गोष्टी थोड्याच कालावधीत ती शिकली. ती आता रणभूमीवरील खरी सैनिक झाली होती. युलिया ज्या १५० सैनिकांच्या युनिटमध्ये होती, त्यात ती एकटीच महिला होती. आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून, विपरित परिस्थितीत तीही रशियन सैनिकांशी लढत होती..

 

Web Title: I am not afraid of death, Putin; Brave yulia bondarenko's life changed, his story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.