'तालिबाननं माझ्या घरात येऊन मला मारुन टाकावं' अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला महापौराचं ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:23 AM2021-08-17T10:23:07+5:302021-08-17T10:32:55+5:30
Afghanistan Crisis: 'कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाची साथ सोडू शकत नाही.'
काबुल:तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये झपाट्यानं बदल होत आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राजदूत आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांनी आधीच देशातून पलायन केलं. अफगाणी नागरिकांनाही देशातून पळून जायचंय, पण त्यांचे मार्ग आता बंद झालेत. यादरम्यान, अफगाणिस्तानातील पहिल्या महिला महापौर जरीफा गफारी यांनी थेट तालिबानला मोठं आव्हान दिलंय. 'मी तालिबानी दहशतवादी येण्याची वाट पाहत आहे. तालिबाननं यावं आणि मला ठार मारावं,' अस खुलं आव्हान त्यांनी दिलं.
वारदक राज्याच्या महापौर जरीफा आय न्यूज वेबसाइटशी बातचीतमध्ये म्हणाल्या, 'एका आठवड्यापूर्वी मला वाटतं होतं की, देशातील परिस्थिती सुधारेल. पण, आता परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली आहे. सर्व नेते निघून गेले, पण मी कुठेच जाऊ शकत नाही. मी माझ्या घरात माझ्या कुटुंबासोबतच राहणार. माझ तालिबानला खुलं आव्हान आहे, त्यांनी यावं आणि माझ्या कुटुंबासह मला मारुन टाकावं.'
कोण आहेत जरीफा गफारी
27 वर्षीय जरीफा 2018 मध्ये अफगाणिस्तानच्या वारदक राज्यातून सर्वात तरुण आणि पहिल्या महिला महापौर झाल्या होत्या. देशात तालिबान आपलं डोकं वर काढत असताना अफगाण सरकारने गफारी यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. गफारी यांच्या वडिलांची मागच्या वर्षी 15 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली होती.