‘ताज’ला भेट न देऊ शकल्याची खंत
By admin | Published: April 30, 2016 03:52 AM2016-04-30T03:52:43+5:302016-04-30T03:52:43+5:30
भारत दौऱ्यात गतवर्षी ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा नाराज होते.
वॉशिंग्टन : भारत दौऱ्यात गतवर्षी ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा नाराज होते. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे.
व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मागील वर्षी भारत दौऱ्यादरम्यान ताजमहालला भेट न देऊ शकल्यामुळे ओबामा हे नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ओबामा हे गतवर्षी जानेवारीत दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हजर राहिले होते. ओबामा आणि मिशेल यांचा आग्रा दौरा निश्चित होता; पण सौदीचे शाह अब्दुल्ला यांच्या निधनामुळे आपला दौरा आटोपून ओबामा सौदीला रवाना झाले. त्यामुळे ताज भेट राहून गेली. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले की, २० जानेवारीला ओबामा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. तत्पूर्वी त्यांची ताजमहाल पाहण्याची इच्छा आहे. मला असे वाटते की, अजूनही हे शक्य आहे.