Video: "मी हिंदू म्हणून आलोय"; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटलं "जय सियाराम"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:30 AM2023-08-16T09:30:32+5:302023-08-16T09:45:16+5:30
कॅम्ब्रीज विद्यापीठात भारताच्या स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित मोरारी बापूंच्या रामकथा कार्यक्रमात ऋषी सुनक यांचा सहभाग लक्षवेधी ठरला
कॅम्ब्रीज- ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक यांनी मंगळवारी कॅम्ब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या रामकथा कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांच्याकडून येथे रामकथा कार्यक्रम होत आहे. मी एक हिंदू म्हणून येथे उपस्थित आहे, पंतप्रधान म्हणून नाही, असे म्हणत सुनक यांनी मोरारी बापूंच्या व्यासपीठावर पुष्पांजली वाहिली. त्यानंतर, ''जय सियाराम''चा जयघोष करत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
कॅम्ब्रीज विद्यापीठात भारताच्या स्वतंत्रता दिनानिमित्त आयोजित मोरारी बापूंच्या रामकथा कार्यक्रमात ऋषी सुनक यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी येथे एक हिंदू म्हणून रामायण कार्यक्रमात रामायण ऐकण्यासाठी आलो आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून नाही, असे सुनक यांनी म्हटले. एएनआय न्यूज एजन्सीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
माझ्यासाठी आस्था हा अत्यंत व्यक्तिगत विषय आहे. त्यातूनच, मला आयुष्यातील प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन मिळत आहे. पंतप्रधान बनने हा मोठा सन्मान आहे. मात्र, सहज-सोपं काम नाही. कारण, अनेकदा आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात. कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणून, याच आस्थेतून देशासाठी सर्वोत्तम करण्याची प्रेरणा आणि धाडस मला मिळते, असेही सुनक यांनी म्हटलं.
प्रभू श्रीराम हे माझ्यासाठी प्रत्येक अडचणींवर धैर्याने मात करण्याचं, विनम्रपणे शासन करणे आणि निस्वार्थ भावनेने काम करण्याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे. हिंदू धर्मग्रंथांनी ज्याप्रकारे नेतृत्त्व करण्याचं शिकवलं आहे, त्याप्रमाणे नेतृत्व करण्याची इच्छा मी बाळगतो, असेही सुनक यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सुनक यांची धर्माबाबतची श्रद्धा आणि आस्था सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, मोरारी बापूंच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या पाठिमागे असलेली हनुमानजींची स्वर्ण प्रतिमा, त्याचप्रमाणे सुनक यांच्या १० डाऊनिंग स्ट्रीट येथील कार्यालयात श्री गणेश यांची स्वर्ण प्रतिमा आहे, ती प्रतिमा माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही ऋषी सुनक यांनी म्हटलंय.