भारतीय असून भारताबाबतच वाईट बोललेल्या; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:48 AM2022-10-20T11:48:01+5:302022-10-20T11:48:40+5:30
सुएला 43 दिवसांपासून यूकेच्या गृहमंत्री आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन नंतर त्या सर्वाधिक कमी काळ या पदावर राहिलेल्या मंत्री ठरल्या आहेत.
ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री आणि अनिवासी भारतीय असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीयांविरोधात वक्तव्य केले होते. आता त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारत-ब्रिटनमधील मुक्त व्यापार समझोत्याला विरोध केला होता. एकाच आठवड्याच्या अंतराने दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने नुकतेच सत्तेत आलेल्या लिझ ट्रस सरकारला धक्का बसला आहे.
ब्रिटनमध्ये नवीन सरकार आले आहे. कंजर्वेटिव पक्षाचे वार्षिक संमेलन होते, यात नव्या पंतप्रधानांनी एफटीएवर या महिन्याच्या अखेरीस सह्या करून पूर्णत्वास नेले जाईल असे म्हटले होते. यानंतर लगेचच त्यांच्या भारतातूनच ब्रिटनमध्ये गेलेल्या व गृहमंत्री झालेल्या ब्रेव्हरमन यांनी याविरोधात वक्तव्य केले होते. आता सुएला यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्रस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुएला यांच्या राजीनाम्यापूर्वी चीफ व्हीप वेंडी मॉर्टन आणि त्यांचे डेप्युटी क्रेग व्हिटेकर हे देखील सरकारमधून बाहेर पडल्याचे बोलले जात होते. काही तासांच्या चुप्पीनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून ते आपल्या पदावर कायम असल्याचे सांगण्यात आले.
सुएला यांच्यावर स्थलांतरितांशी संबंधित सरकारी दस्तऐवज प्रकाशित होण्यापूर्वीच ती कागदपत्रे सहकारी खासदाराला पाठवल्याचा आरोप आहे. यामुळे आपल्या वैयक्तिक ईमेलच्या गैरवापरामुळे मंत्री पद सोडत असल्याचे ब्रेव्हरमन कारण दिले आहे. तर दुसरीकडे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांच्या दबावामुळे ब्रेव्हरमन यांना काढून टाकण्यात आल्याचे काही खासदारांचे म्हणणे आहे. नुकतीच अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांचीही हकालपट्टी करण्यात आली होती, त्यांच्याजागी जेरेमी हंट आले होते.
आम्ही चुका केल्या नाहीत असे भासवतोय. लोकांना असे वाटतेय जादूने आपोआपच या चुका सुधरतील. माझ्याकडून चूक झाली असून जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे. आपण कठीण काळातून जात आहोत हे सर्वांनाच माहीत आहे. मला या सरकारची चिंता आहे. आम्ही आमच्या मतदारांना दिलेली आश्वासने मोडली आहेत, असे सुएलांनी म्हटले आहे.
सुएला 43 दिवसांपासून यूकेच्या गृहमंत्री आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन नंतर त्या सर्वाधिक कमी काळ या पदावर राहिलेल्या मंत्री ठरल्या आहेत. ड्यूक ऑफ वेलिंग्टन हे 1834 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यासाठी ब्रिटनचे गृहमंत्री होते.