मी शाळेत न जाताच शिकलो, पाकच्या राष्ट्रपतींची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 08:30 PM2016-12-22T20:30:21+5:302016-12-22T21:41:57+5:30
पाकिस्तानला अनेक वादग्रस्त आणि तितकेच कट्टरवादी राष्ट्रपती लाभले.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 22 - पाकिस्तानला अनेक वादग्रस्त आणि तितकेच कट्टरवादी राष्ट्रपती लाभले. मात्र त्यातील काही राष्ट्रपती शाळेतही गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. मी कधीच शाळेत गेलो नसल्यानं मला खेळण्याचा आनंद लुटता आला नाही, काही कारणास्तव माझी शाळा घरातच भरत होती, असं वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केलं आहे.
हुसेन हे इस्लामाबादमधील हसनाबदल येथे विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. ज्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी घरीच शिक्षण घेतल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली आहे, असं वृत्त डॉननं दिलं आहे.
हुसेन हे पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये वास्तव्याला आहेत. भारताच्या विभाजनानंतर ते आग्रा येथून कराचीत आले. त्यांनी नम्रतेने स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग आणि नवाज शरीफ यांच्याप्रति निष्ठा असल्यानंच त्यांची राष्ट्रपतीपदी वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.