मी कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ देईन; पाकचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:32 AM2022-05-31T10:32:15+5:302022-05-31T10:32:23+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना अल्टिमेटम दिला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना सत्तेवर येऊन केवळ ४० दिवस झाले नाहीत तोवर ते महागाईमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. पाकच्या पंतप्रधानांनी वाढत्या महागाईसाठी इम्रान खान सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना गव्हाचे पीठ स्वस्त करण्याचा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांना अल्टिमेटम दिला आहे. जर महमूद खान यांनी येत्या २४ तासांत १० किलो गव्हाच्या पिठाच्या गोणीची किंमत ४०० रुपयांनी कमी केली नाही तर ते मी माझे कपडे विकून लोकांना स्वस्तात पीठ देईन, असे शरीफ यांनी म्हटले आहे. रविवारी ठाकारा स्टेडियममध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पाकचे पंतप्रधान म्हणाले की, मी माझे शब्द पुन्हा सांगतो, मी माझे कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ देईन. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ऑडिओ टेपच्या मुद्द्यावरून इम्रान यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, समोर आलेल्या ऑडिओ टेपने इम्रान खान यांचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघड केला आहे. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर परकीय कारस्थानाची खोटी कथा रचण्यात आली. मात्र, त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे.