देश सध्या संकटात, आधीच्या पंतप्रधानांकडून झालेल्या चुका सुधारणार; PM होताच ऋषी सुनक स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 08:12 PM2022-10-25T20:12:04+5:302022-10-25T20:15:00+5:30
भारतीय वंशाचे ४२ वर्षीय ऋषी सुनक अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. सुनक यांनी आज बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली.
ब्रिटन-
भारतीय वंशाचे ४२ वर्षीय ऋषी सुनक अखेर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. सुनक यांनी आज बकिंघम पॅलेसमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली. प्रिन्स चार्ल्स यांनी सुनक यांना अपॉइंटमेंट लेटर सुपूर्द करत त्यांना नवं सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. प्रिन्स चार्ल्स आणि सुनक यांची भेट पॅलेसच्या रुम नंबर १८४४ मध्ये झाली. परंपरेनुसार सुनक हे त्यांच्या खासगी कारमधून बकिंघम पॅलेसमध्ये पोहोचले होते.
प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधानपदाचं अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर ऋषी सुनक पंतप्रधानांच्या अधिकृत कारमधून पीएमच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या रेसिडेन्स १० डाऊनिंग स्ट्रीट येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा संबोधित केलं. ऋषी सुनक यांनी आपल्या संबोधनात देश संकटात असल्याचं मान्य करत आधीच्या पंतप्रधानांनी केलेल्या चुका सुधारणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.
"मी नुकताच प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेऊन आलो. त्यांनी मला नवं सरकार स्थापन करण्यास सांगितलं आहे. तुम्हाला सर्वांना माहितच आहे सध्या आपण आर्थिक पातळीवर संकटाचा सामना करत आहोत. कोविडमुळे याआधीच आपण आव्हानाचा सामना करत आहोत. त्यात पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करुन परिस्थिती आणखी खराब केली आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी न थकता काम केलं, पण काही चुका देखील झाल्या. आता त्या चुका सुधारण्याचं काम आम्ही करू", असं ऋषी सुनक म्हणाले.
देशाला एकसंध करुन दाखवेन
"मी या देशाला पुन्हा एकदा एकसंध करुन दाखवेन. मी हे फक्त बोलत नाहीय. तर करुनही दाखवेन. दिवस-रात्र तुमच्यासाठी काम करेन. २०१९ साली कंझर्व्हेटिव्ह पार्टीला समर्थन मिळालं होतं. ते काही एका व्यक्तीसाठी समर्थन नव्हतं. हेल्थ, बॉर्डर प्रोटेक्शन आणि आर्म्ड फोर्सेससाठी काम केलं जाईल. आज आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. चान्सलर म्हणून मी आजवर जी कामं केली आहेत ती यापुढेही सुरू ठेवेन. लोकांचं हित पक्षीय राजकारणापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करुन दिला जाईल. रस्ता खूप कठीण आहे पण आपण नक्कीच यशस्वी होऊ", असं ऋषी सुनक म्हणाले.