आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत

By admin | Published: August 21, 2014 02:08 AM2014-08-21T02:08:38+5:302014-08-21T15:07:21+5:30

संशोधनासाठी एएलएस आईस बकेट चॅलेंज ही अभिनव कल्पना राबवून निधी उभारणारा कोरे ग्रिफीन (27) याचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाला.

Ice Bucket Challenge's Unfortunate End of Core Griffin | आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत

आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत

Next
मॅसॅच्युसेट : परोपकारी वृत्तीचा आणि गंभीर आजारावरील संशोधनासाठी एएलएस आईस बकेट चॅलेंज ही अभिनव कल्पना राबवून निधी उभारणारा कोरे ग्रिफीन (27) याचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाला. मॅसॅच्युसेटमधील नॅनटुककेट समुद्र किना:यावर 16 ऑगस्ट रोजी कोरे ग्रिफिन पोहायला गेला होता, तेथे त्याचा बुडून मृत्यु झाला.
 

 ओले चिंब..शिरशिरी आणणारे मजेशीर चॅलेंज!

आपला ट्रेडमार्क राखाडी टीशर्ट घातलेला मार्क झुकेरबर्ग पायाशी ठेवलेली एक मोठी बादली आपणच आपल्या डोक्यावर ओतून घेतो आणि गारेगार पाण्याने कुडकुडत म्हणतो, ''हे पाहा मी घेतले चॅलेंज, आता बिल गेट्स यांनी हे करून दाखवावे''. फिक्या निळ्या रंगाचा शर्ट घातलेले बिल गेट्स एका कागदावर मन लावून एक आकृती काढताना दिसतात. 
पुढच्याच मिनिटाला त्या आकृतीनुसार उभ्या केलेल्या एका सांगाड्यावर लटकलेल्या दहीहंडीसारखी बांधलेली एक प्लॅस्टिकची बादली दिसते आणि बादलीला लटकणारा एक दोर. तो दोर ओढताच वरच्या बादलीतले बर्फाचे गारेगार पाणी बिल गेट्स यांच्या डोक्यावर बदाबदा कोसळते आणि गेट्स म्हणतात, ''मार्कचे (झुकेरबर्ग) चॅलेंज मी घेतले. आता मी क्रीस अँण्डर्सन (टेड कॉन्फरन्सचे संचालक) यांना चॅलेंज देतो, त्यांनी हे करूनच दाखवावे.'' 
आपल्या डोक्यावर पहिली बादली ओतली ती अमेरिकेचा माजी बेसबॉल खेळाडू पीट फ्रेट याने. फ्रेट स्वत: गेल्या दोन वर्षांपासून एएलएस या व्याधीने ग्रस्त आहे. या व्याधीविषयी जनजागृती व्हावी म्हणून हे 'आइस वॉटर बकेट' प्रकरण पीटनेच सुरू केले. त्याला ही 'आयडिया' एका मित्राने दिल्याचे पीट सांगतो. 
 
आहे काय हा प्रकार आइस बकेट चॅलेंज? 
- अमेरिकेत सुरू झालेले हे लोण अत्यंत वेगाने जगभरात पसरत असून, भारतातही आपापल्या डोक्यावर बर्फाच्या पाण्याच्या बादल्या ओतून घेण्याची लागण होण्याची दाट शक्यता आहे. 
- एएलएस या अत्यंत गंभीर मेंदूविकाराबद्दल जनजागृती व्हावी, या व्याधीविषयीच्या संशोधनासाठी निधी उभारला जावा आणि जगभरातील धोरणकर्त्यांचे या व्याधीने ग्रस्त असलेल्या आपल्या नागरिकांच्या वेदनांकडे लक्ष जावे, यासाठी सुरू झालेली ही अनोखी प्रचारमोहीम पाहाता पाहाता एका वादळाचे स्वरूप धारण करू लागली असून, अमेरिकेला चिंब भिजवून आता जगाला धडका देऊ पाहाते आहे. 
- या मोहिमेतून उभा झालेला निधी तब्बल २ कोटी ३0 लक्ष डॉलर्सवर पोचल्याचे अमेरिकेतल्या एएलएस सोसायटीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. 
- एका गंभीर व्याधीबद्दलच्या जनजागृतीसाठी हे असले ऑनलाइन खूळ जन्माला घातल्याबद्दल आणि भल्याभल्यांनी त्यात सहभाग घेऊन हा बालीशपणा पुढे चालवल्याबद्दल टीकेचे सूर उमटत असले, तरी आंतरजालावर मात्र हे लोण वेगाने पसरते आहे. 
 
आइस बकेट चॅलेंज
बर्फाच्या गारेगार पाण्याने भरलेली बादली आपल्या डोक्यावर ओतून घ्यायची. पाण्याने चिंब निथळत असताना पुढल्या तिघांची नावे घेऊन त्यांच्याकडे चॅलेंज पास करायचे, याचा व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करायचा.
ज्यांना ज्यांना हे चॅलेंज मिळाले असेल, त्यांनी पुढल्या २४ तासांच्या आत बर्फगार पाण्याची बादली डोक्यावर ओतून घ्यायची किंवा मग कमीत कमी १00 अमेरिकन डॉलर्स एएलएस या व्याधीवरील संशोधनकार्यासाठी देणगी म्हणून जमा करायचे. बादली ओतून घेऊन देणगीही देण्याचा पर्याय अर्थातच खुला आहे. 
आता भारतातही? 
अमेरिकेतून सुरू झालेले हे लोण मान्यवर विश्लेषकांच्या दृष्टीने काहीसाटीकेचा विषय ठरलेले असले, तरी भारतातही आता ही आइस बकेट चॅलेंजची लाट येऊ घातली आहे. आपल्या पिवळ्यार्जद पगडीवर पहिल्यांदा बर्फाची बादली ओतून घेतली ती दलेर मेहेंदीने! त्याच्या मागोमाग बिपाशा बासू आणि सानिया मिर्झानेही भर पावसात हा गारेगार वर्षाव झेलला.
 
एएलएस म्हणजे काय?
अँमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरॉसिस.
मानवी शरीराच्या हालचाली नियंत्रित करणारे मज्जातंतू पाठीच्या कण्यामध्ये असणार्‍या मज्जारज्जूमधून संपूर्ण शरीरभर आपले जाळे पसरतात. मेंदूकडून मिळणार्‍या आज्ञा या मज्जातंतूंमार्फत स्नायूंपर्यंत पोचवल्या जातात आणि हातापायांच्या अपेक्षित हालचाली होतात.
एएलएस या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील हे मज्जातंतू वेगाने झीज पावू लागतात आणि त्यांना जोडलेले स्नायूही मग एकेक करून मंद होत काम थांबवतात. पायाच्या बोटांपासून सुरुवात होऊन साधारणत: पाच ते सात वर्षांत रुग्णाचे पूर्ण शरीरच पांगळे होऊन जाते आणि मृत्यू ओढवतो.
मज्जाततूंची झीज वगळता मेंदूचे उर्वरित कार्य मात्र नीट चालू असणारी व्यक्ती अंथरुणाला खिळून मृत्यूची वाट पाहाणे नशिबी आल्यावर अखेरीस मानसिक औदासिन्याची शिकार होते. या व्याधीवर अजून कोणतेही खात्रीशीर उपचार उपलब्ध नाहीत; कारण तिचे मूळ शोधण्यासाठीच आधुनिक विज्ञानाला चाचपडावे लागत आहे.
एकेक करून प्रत्येक अवयवाच्या हालचाली मंदावत थांबत असतानाच्या काळात रुग्णाला अनेक प्रकारच्या वैद्यकीय प्रश्नांना सामोरे जावे लागते. हा काळ संपूर्ण कुटुंबासाठीच अत्यंत अवघड असतो आणि खर्चिकही!
भारतातही या गुंतागुंतीच्या व्याधीबद्दल अजून पुरेशी जनजागृती झालेली नाही.
- डॉ. महेश करंदीकर, मेंदूविकार तज्ज्ञ
 

Web Title: Ice Bucket Challenge's Unfortunate End of Core Griffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.