चंद्रावर आढळले पाणी! भारताच्या चंद्रयान-1च्या शोधाला नासाचा दुजोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:49 PM2018-08-21T20:49:23+5:302018-08-21T20:49:52+5:30
चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे.
वॉशिंग्टन - चंद्राच्या काही भागावर पाणी असल्याच्या दाव्याला आता पुष्टी मिळू लागली आहे. भारताच्या इस्रोने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-1 या यानाने चंद्गाच्या ध्रुवीय प्रदेशात अंधाऱ्या आणि थंड ठिकाणी बर्फाच्या रूपात पाणी गोठलेले असल्याची माहिती आकडेवारीसह दिली होती. दरम्यान, या आकडेवारीच्या आधारावर चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाणी असण्याच्या शक्यतेला अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दुजोरा दिला आहे. चंद्रयान-1 या यानाचे भारताने दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपण केले होते. }
चंद्राच्या पृष्टभागावर पुरेशा प्रमाणात बर्फ असल्याचे संकेत मिळाल्याने पुढच्या चांद्र मोहिमांमध्ये तसेच भविष्यात चंद्रावर राहण्यासाठी पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीएनएस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधामध्ये हा बर्फ इतरत्र विखुरलेला असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ हा लुनार केटर्सजवळ जमा झालेला असल्याचे या प्रबंधामध्ये म्हटले आहे.
चंद्राच्या उत्तर ध्रुवावरही मोठ्या प्रमाणात बर्फ असून, तोही अधिक विखुरलेला आहे. शास्त्रज्ञांनी नासाच्या मून मिनरेलॉजी मॅपर (एम 3) कडून मिळालेल्या आकडेवारीवरून चंद्राच्या पृष्टभागावर बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे सांगण्यात आले होते. इस्त्रोच्या चंद्रयान-1 सोबत एम 3 हे उपकरण पाठवण्यात आले होते.
चंद्राच्या कललेल्या आसामुळे जिथे सूर्याचा प्रकाश कधीच पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी हे पाणी सापडले आहे. तसेच येथील तापमान हे उणे 156 डिग्रीच्या वर कधीही गेलेले नाही. त्याआधीच्या संशोधनांमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.