पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्सचा खुलासा, 714 भारतीयांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 08:13 AM2017-11-06T08:13:01+5:302017-11-06T09:06:46+5:30
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. जर्मनीतील 'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. या वृत्तपत्रानं 'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याच वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते. 'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे. पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत.
जागतिक पातळीवर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.
या भारतीयांच्या नावाचा आहे समावेश
नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.