जहाज खांबाला धडकले अन् ४७ वर्षे जुना पूल कोसळला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:55 AM2024-03-27T07:55:31+5:302024-03-27T07:55:45+5:30
अपघातात पुलावरील अनेक वाहने नदीत पडली. मंगळवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बाल्टिमोर (अमेरिका) : मेरिलँडच्या पॅटापस्कोट नदीतील फ्रान्सिस की ब्रिज या पुलाच्या खांबाला मालवाहू जहाज धडकून अवघा पूल नदीत कोसळला. अपघातात पुलावरील अनेक वाहने नदीत पडली. मंगळवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, दोघांना वाचवण्यात यश आले. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू करण्यात आला. या अपघातांनंतर मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी आणीबाणी घोषित केली.
बुडालेल्या लोकांच्या जीवाला धोका
एप्रिल महिन्यात पॅटापस्कोट नदीतील पाण्याचे तापमान १० अंशांपेक्षा कमी असते. त्यामुळे या तापमानातील पाण्यात बुडालेल्या लोकांना हायपोथर्मिया होण्याचा धोका असतो. त्यात शरीराचे तापमान वेगाने खाली येऊन ते जीवावर बेतू शकते.
सर्व २२ क्रू मेंबर भारतीय
सिंगापूरचा ध्वज असलेले 'डाली' नामक हे जहाज ग्रेस ओशन प्रा.लि. कंपनीचे असल्याचे म्हटले जाते. ९४८ फूट लांब हे मालवाहू जहाज कोलंबोला निघाले होते. विशेष म्हणजे या जहाजातील सर्व २२ क्रू मेंबर भारतीय असल्याचे समोर आले.
तीन किमीचा पूल क्षणार्धात नदीत
पॅटापस्कोट नदीवर १९७७ मध्ये फ्रान्सिस की ब्रिज हा पूल बांधण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट यांचे नाव या पुलाला देण्यात आले. हा पूल जवळपास तीन किमी लांबी आहे.