सापडलेल्या बोटांवरून हल्लेखोराला ओळखले

By admin | Published: November 16, 2015 03:49 AM2015-11-16T03:49:23+5:302015-11-16T03:49:23+5:30

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या आजवरच्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाची चक्रे इतरही युरोपीय देशांमध्ये वेगाने फिरू लागली आहेत.

Identifying the attacker by the fired | सापडलेल्या बोटांवरून हल्लेखोराला ओळखले

सापडलेल्या बोटांवरून हल्लेखोराला ओळखले

Next

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या आजवरच्या सर्वांत भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाची चक्रे इतरही युरोपीय देशांमध्ये वेगाने फिरू लागली आहेत. ठार झालेल्या सातपैकी एका हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर फ्रेंच पोलिसांनी त्याच्या वडील आणि भावाला अटक केली. बेल्जियममध्येही एकाच कुटुंबातील सहा जणांची धरपकड करण्यात आली असून, जर्मनीतही एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
सर्वाधिक ८९ निरपराध जेथे मारले गेले त्या बेटॅक्लॉ हॉलवर हल्ला करणाऱ्यांपैकी एक उमर इस्माईल मुस्तेफई नावाचा २९ वर्षांचा अल्जिरियन वंशाचा फ्रेंच नागरिक होता, असे पॅरिस पोलिसांनी जाहीर केले आहे. बेटॅक्लॉ हॉलमध्ये सापडलेल्या बोटांच्या ठशांद्वारे त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. पॅरिसच्या कोरकोरोनस या उपनगरात जन्मलेल्या मुस्तफई याला तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्याच्यावर किरकोळ आठ गुन्ह्यांची नोंद आहे; पण तो कधीही जेलमध्ये गेला नव्हता. बेटॅक्लॉ हॉलमध्ये सापडलेल्या बोटाचे ठसे पोलीस फाईलमध्ये असलेल्या ठशांशी जुळतात.
पॅरिसचे प्रॉसिक्युटर फ्रान्स्वा मोलिन्स यांनी सांगितले की, कट्टरपंथी असल्याने २०१० मध्ये तो अधिकाऱ्यांच्या रडारवर आला होता; पण आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी नेटवर्कमध्ये तो अडकला नव्हता. त्याच्या पित्याला आणि भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुस्तफई याचे हे कृत्य म्हणजे मूर्खपणा आणि वेडेपणा असल्याचे त्याच्या भावाने सांगितले.
या हल्ल्याचा तपास आता फ्रान्सच्या बाहेरही चालू असून, बेल्जियम पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण हल्ल्याच्या वेळी पॅरिसमध्ये उपस्थित होता. बेटॅक्लाँ हॉलजवळ आढळलेल्या मोटारीशी संबंधित ही धरपकड असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेवारस कारमध्ये शस्त्रास्त्रे
याच घटनाक्रमाशी निगडित अन्य एका घडामोडीत पॅरिसमधीलच एका उपनगरात बेवारस कार सापडली असून, त्यात हल्ल्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या अनेक एके-४७ यासारख्या शस्त्रास्त्रांसह अनेक शस्त्रे सापडली आहेत. हल्लेखोरांनी अनेक ठिकाणी या कारचा वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
(वृत्तसंस्था)

स्तंभित जगाचा पाठिंबा
या हल्ल्याने संपूर्ण जग स्तब्ध झाले असून, फ्रान्सला पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील टॉवर ब्रिज, बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट, न्यूयॉर्कस्थित विश्व व्यापार केंद्रासह अनेक ठिकाणी फ्रान्सच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाने रोषणाई करण्यात आली.
——————
ही इस्लामविरोधी लढाई नाही
ब्रुसेल्स : पॅरिसवर झालेले हल्ले म्हणजे कट्टरवादी आणि लोकशाही मूल्य मानणारे समर्थक यांच्यातील संघर्ष असून, तो इस्लाम आणि पाश्चिमात्य देशांची लढाई नाही, असे नाटोप्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी म्हटले आहे.
एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेत आता ‘इसिस’ विरुद्ध मुस्लिम लोकच लढाईचे नेतृत्व करीत आहेत. कारण ‘इसिस’च्या दहशतवादाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसत आहे. त्यामुळे हा संघर्ष इस्लामी जग आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील नाही.

Web Title: Identifying the attacker by the fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.