चीन आणि अमेरिकेमध्ये २०२५ मध्ये युद्ध झाल्यास कोण जिंकणार? आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:04 PM2023-02-06T12:04:00+5:302023-02-06T12:04:56+5:30
US Vs China: अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली - अमेरिकन सैन्याने काल चीनच्या एका हेरगिरी करणाऱ्या फुग्याला नष्ट केल्यापासून या दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमधील तणाव युद्धापर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. यूएस एअरफोर्सच्या एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख माइक मिनिहॅन यांच्या एका लीक मेमोमद्ये दोन्ही देशांमधील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. हा मेमो लीक झाल्यापासून चीन आणि अमेरिकेमध्ये युद्धाबाबत विविध प्रकारच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, २०२५ मध्ये या दोन्ही महासत्तांमध्ये युद्ध झाल्यास कुणाचं पारडं जड ठरेल, कोण युद्धात बाजी मारेल, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांची ताकद पुढीलप्रमाणे आहे.
द सन युके ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडे सध्या १३ लाख सैनिक आहेत. तर चीनकडे २० लाख सैनिक आहेत. त्यामुळे लष्करी शक्तीमध्ये चीनचे पारडे जड आहे. मात्र हवाई ताकदीमध्ये अमेरिका वरचढ दिसते. अमेरिकेकडे १३ हजार ३०० लढाऊ विमाने आहेत. या तुलनेत चीन खूप मागे आहे. चीनकडे ३२०० लढाऊ विमाने आहेत. रणगाड्यांचा विचार केल्यास अमेरिकेकडे ५५०० रणगाडे आहेत. तर चीनकडे ४९५० रणगाडे आहेत.
दोन्ही देशांमधील सागरी शक्तीचा विचार केल्यास अमेरिकेकडे ४२८ युद्धनौका आहेत. याबाबतीत चीन अमेरिकेपेक्षा वरचढ आहे. चीनजवळ सध्या ७३० युद्धनौका आहेत. अण्वस्रांच्या विचार केल्यास अमेरिकेकडे तब्बल ५ हजार ४२८ अण्वस्रे आहेत. चीनजवळ ३५० अण्वस्रे आहेत.
चीन आणि अमेरिकेच्या लष्करी ताकदीवर खर्चाचा विचार केल्यास अमेरिका आपल्या लष्करी शक्तीवर ८५८ बिलियन डॉलर खर्च करत आहे. तर चीन लष्करी शक्तीवर २६१ बिलियन डॉलर खर्च करतात. चीनच्या तुलनेत अमेरिका लष्करी शक्तीवर चार पट अधिक खर्च करते. मात्र अमेरिका सध्या आपल्या संरक्षण बजेटशिवाय युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवढा करत आहे. तसेच तैवानला मदतीसाठीही वेगळी तरतूद करण्यात आली आहे.