"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:10 AM2024-05-13T01:10:57+5:302024-05-13T01:16:03+5:30
या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता, हमासने ओलीस ठेवलेल्या सर्व लोकांना सोडल्यास गाझामध्ये दुसऱ्याच दिवशी युद्धविराम शक्य असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले बायडेन? -
यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन म्हणाले, "पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर ओलिस ठेवलेल्या सर्व लोकांची सुटका केल्यास, इस्रायल आणि हमास यांच्यात तत्काळ युद्धविराम होईल. मात्र, हे हमासवर अवलंबून असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. जर, असे करण्याची त्यांची इच्छा असेल तर, आपण हे उद्या संपवू शकतो आणि दुसऱ्याच दिवशी युद्धविराम सुरू होईल."
अमेरिकेने इस्रायलला दिला होता इशारा -
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी इस्रायलला इशारा देत, "जर राफा शहरावर हल्ला केला, तर अमेरिका शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवेल. इस्रायलने हमास हल्ल्यात जी शस्त्रे वापरली, ती अमेरिका पुरवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, इस्रायलने अमेरिकेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत शनिवारी राफासह गाझातील अनेक भागांवर हल्ले केले होते.