मी भारतीय असते तर...! अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिकेची नितीशकुमारांवर टीका; मोदींचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:58 PM2023-11-09T12:58:29+5:302023-11-09T12:59:17+5:30
महिलांविरोधातील वक्तव्यावरून नितीशकुमारांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत जी मुक्ताफळे उधळली त्यावर आता परदेशातूनही टीका होऊ लागली आहे. नितीशकुमारांनी महिलांवर एवढी अश्लिल टीका केलीय की त्याची दखल आता परदेशातील सेलिब्रिटींनीही घेतली आहे. त्यांनी यावर माफी देखील मागितली आहे, परंतू हा टीकेचा मार काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीय.
अमेरिकेची प्रसिद्ध गायिका मॅरी मिलबेन हिने आज नितीशकुमारांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली आहे. मी जर भारतीय नागरीक असते तर बिहारमध्ये जाऊन त्यांच्याविरोधात निवडणूक लढविली असती, असे वक्तव्य तिने केले आहे.
याचबरोबर मिलबेन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे. भारत-अमेरिका संबंध आणि जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी सर्वोत्तम नेते असल्याचे तिने म्हटले आहे. आफ्रिकन-अमेरिकन गायिका मिलबेनने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने नितीश कुमारांविरोधात राग व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये महिलांच्या मूल्यांना आव्हान देण्यात आले आहे आणि मला वाटते की या आव्हानाला एकच उत्तर असू शकते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणीतरी ताकदवान महिलेने पुढे येऊन नितीशकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवावी, असे आपल्याला वाटत असल्याचे तिने म्हटले आहे. मी जर भारताची नागरिक असते तर बिहारमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवली असती. आता वेळ आली आहे, नितीश कुमारांनी राजीनामा द्यावा आणि एका महिलेने बिहारची मुख्यमंत्री व्हावे, असे मिलबेनने म्हटले आहे.