'पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो तर मुस्लीम देशांतील वादग्रस्त लोकांवर बंदी घालेन'- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 07:51 PM2023-10-29T19:51:51+5:302023-10-29T19:52:39+5:30
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद, इस्रायल-हमास युद्धावरुन जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली.
America Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास मुस्लिमबहुल देशांतील काही वादग्रस्त लोकांवर पुन्हा प्रवास बंदी लागू करणार, असे ते म्हणाले आहेत. शनिवारी रिपब्लिकन ज्यू कोलिशनच्या वार्षिक शिखर परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ट्रम्प म्हणाले, अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी अशा लोकांवर देशात बंदी घालेन. आम्हाला आमच्या देशात असे लोक नको, ज्यांच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात. माझ्या कारकिर्दीत एकही अशा घटना घडली नाही, कारण आम्ही त्या लोकांना आमच्या देशाबाहेर ठेवले. दरम्यान, 2017 मध्ये ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी इराण, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि सुरुवातीला इराक आणि सुदानमधील काही लोकांवर निर्बंध लादले होते.
110 टक्के इस्रायलच्या पाठीशी
आपल्या संबोधनावेळी शेकडो समर्थकांसमोर ट्रम्प यांनी इस्रायलसोबत असल्याचे जाहीर केले. जो बायडेन यांच्या कमकुवतपणामुळे आपला देश नष्ट होईल, अशी भीती वाटत असलेल्या प्रत्येक अमेरिकनला मी हे वचन देतो. तुमचा अध्यक्ष या नात्याने मी देशात शांतता प्रस्थापित करेन आणि तिसरे महायुद्ध रोखेन, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
...तर हल्ला झाला नसता
ट्रम्प पुढे म्हणाले, मी राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्रायलवर कधीही हल्ला झाला नसता. आमच्या काळात सर्वात क्रूर दहशतवादी कासिम सुलेमानीचा खात्मा केला. पूर्वीच्या नेत्यांनी अनेक आश्वासने तोडली, पण मी माझे वचन पाळले. मी व्हाईट हाऊसमध्ये परतेन तेव्हा अमेरिकेच्या शत्रूंना पुन्हा एकदा कळेल की जर तुम्ही आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हालाही ठार मारू. तुम्ही आमच्या रक्ताचा एक थेंब सांडला तर आम्ही तुमच्या रक्ताचे पाट वाहू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
व्हाईट हाऊसने केली टीका
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अँड्र्यू म्हणाले, 2020 मध्ये इस्लामोफोबियामध्ये वाढ झाल्याचे पाहून राष्ट्राध्यक्ष जो बाडेन यांनी अशा निर्णयांचा निषेध केला होता. त्यांनी याला एक घातक रोग म्हटले होते. बायडेन यांनी ही घृणास्पद मुस्लिम बंदी काढून टाकली. बाडेन यांनी इस्लामोफोबियाविरोधात कारवाई केली, पुढेही ही कारवाई केली जाईल. इस्लामोफोबिक घटनांमध्ये होणारी वाढ हा आपल्या राष्ट्राच्या चारित्र्यावर थेट हल्ला आहे. आपण द्वेषाला प्रोत्साहन देत नाही, हे महत्त्वाचे आहे.