मालदीवमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्यास शांत नाही बसणार, चीनचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 11:35 PM2018-02-13T23:35:47+5:302018-02-13T23:40:50+5:30

मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे.

If India intervenes in the Maldives, it will not be silent, China's warning | मालदीवमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्यास शांत नाही बसणार, चीनचा इशारा

मालदीवमध्ये भारतानं हस्तक्षेप केल्यास शांत नाही बसणार, चीनचा इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली- मालदीवमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर सध्या भारताजवळ फक्त चिंता व्यक्त करण्याशिवाय कोणताही उपाय नाही. परंतु भारताच्या भूमिकेवर चीन बारीक लक्ष ठेवून आहे. भारताला ब-याचदा मालदीवपासून दूर राहण्याचा सल्ला देणा-या चीननं आता भारताला गंभीर इशारा दिला आहे. भारतानं मालदीवमध्ये लष्करी कारवाई केल्यास चीन त्यांना रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलेल, असं चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमधून छापलं आहे.

अर्थातच चीननं भारताला सैन्य कारवाईचा अप्रत्यक्षपणे इशारा देऊन टाकला आहे. तर दुसरीकडे मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारतानं 1988साला सारखं पाऊल उचलत सैन्य कारवाई केली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. मात्र भारतानं अद्यापही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ग्लोबल टाइम्समधून छापलेल्या लेखात भारताला सबुरीला सल्ला देण्यात आला आहे. मालेमधली तणावपूर्ण स्थिती पाहता भारतानं संयम बाळगला पाहिजे. मालदीव सद्यस्थितीत अराजकतेचा सामना करतोय. मालदीवचा हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे बाहेरील देशाच्या हस्तक्षेपाचा चीन कडाडून विरोध करेल. जर भारतानं तिथे सैन्य घुसवलेच तर त्यांना रोखण्यासाठी चीनला महत्त्वाचे पाऊल उचलावे लागेल, असंही लेखात नमूद करण्यात आलं आहे.

काही भारतीय हे मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करावा, अशी वकिली करतायत. परंतु आंतरराष्ट्रीय दृष्ट्या हे योग्य नाही. सर्व देश स्वतःचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्वाच्या सिद्धांताचा सन्मान करतात. मालदीवमधील परिस्थिती आणखी चिघळल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावरचा तोडगा काढला जाईल. एकतर्फी सैन्य हस्तक्षेपानं जागतिक व्यवस्था बिघडवली आहे. ग्लोबल टाइम्सनं छापलेल्या लेखात 1988मधल्या मालदीवमधल्या भारताच्या हस्तक्षेपाचाही उल्लेख केला आहे. संपादकीयमध्ये लिहिलं आहे की, 1988मध्ये सरकारच्या विरोधातील काही बंडखोर लोक श्रीलंकेतून आलेल्या शस्त्रास्त्रधारी सैनिकांच्या मदतीनं सत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या विनंतीवरून भारतानं 1600 सैनिकांना मालदीवमध्ये पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

काही लोकांच्या मते मालदीवच्या माध्यमातून भारतानं शक्तिप्रदर्शन केलं होतं. तर काहींना वाटतं भारतानं मालदीवमधलं तत्कालीन सरकार वाचवलं. सुरक्षेसाठी मालदीव भारतावर निर्भर राहत असल्यानं भारताला गर्विष्ठ केलं आहे. त्यामुळेच भारत मालदीवला स्वतःच्या प्रभावाखाली आणू इच्छितो. परंतु मालदीवला राजनैतिकदृष्ट्या भारत नेहमीच दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यानं मालदीवही वैतागला आहे. मालदीव हा चीन, अमेरिका, सौदी अरेबिया, पाकिस्तानकडे झुकत असल्यानं भारताचा तीळपापड होतोय, असंही लेखातून छापण्यात आलं आहे. ग्लोबल टाइम्सच्या लेखानुसार भारतावर आगपाखड करण्यात आली आहे.   

Web Title: If India intervenes in the Maldives, it will not be silent, China's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन